पुणे : दुहेरी खुनातील फरारी आरोपीला अटक; सात महिन्यांपासून नाव बदलून वास्तव्य | पुढारी

पुणे : दुहेरी खुनातील फरारी आरोपीला अटक; सात महिन्यांपासून नाव बदलून वास्तव्य

पुणे; पुढारी वृत्तसेवा: लोणीकंद येथील बाप-लेकाच्या दुहेरी खून प्रकरणातील फरारी आरोपीला लोणीकंद पोलिसांनी बीड येथून
अटक केली. सात महिन्यांपासून नाव बदलून तो बीड येथे वास्तव्य करीत होता. माऊली ऊर्फ केतन रामदास कोलते (वय 28, रा. बकोरी, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. गोल्ड मॅन सचिन शिंदे खून प्रकरणात जामिनावर सुटून बाहेर आल्यानंतर प्रथमेश ऊर्फ सनी कुमार शिंदे व त्याचे वडील कुमार मारूती शिंदे या बाप-लेकाचा खून करण्यात आल्याची घटना 12 जानेवारीला घडली होती.

कुमार हे सनीला मारहाण होत असताना वाचविण्यासाठी आले असताना, हल्लेखोरांनी त्यांनादेखील मारहाण केली होती. त्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात चौदा ते पंधरा जणांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. खुनात सहभागी इतर आरोपींना यापूर्वी अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर मोक्कानुसार कारवाईदेखील करण्यात आली आहे. कोलते हा त्यातील आरोपी असून, तो खून झाल्यापासून फरारी होता.

कोलतेचा शोध घेत असताना, पोलिस उपनिरीक्षक सूरज गोरे, कर्मचारी समीर पिलाने यांना बातमीदरामार्फत माहिती मिळाली होती, की कोलते नाव बदलून बीड येथे राहत आहे. त्यानुसार सहायक पोलिस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार यांच्या सूचनेनुसार गोरे आणि त्यांचे पथक बीड येथे पोहोचले. त्या वेळी त्यांना कोलते हा सहयोगनगर मध्ये येणार असल्याचे समजले. त्यानुसार पथकाने साध्या वेश्यात सापळा रचून कोलतेला पकडून पुण्यात आणले. ही कामगिरी पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कारवाई केली.

Back to top button