

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महापालिकेत प्रशासकराज असतानाही कर्मचारी व अधिकारी कार्यालयांमध्ये केव्हाही येतात, आणि केव्हाही घरी जातात. त्यांच्यावर कोणत्याही वरिष्ठांचे नियंत्रण नसल्याचे आणि सर्वच कार्यालयांमध्ये 'आओ जाओ घर तुम्हारा' अशीच परिस्थिती असल्याचे चित्र महापालिकेत पाहायला मिळते. विशेष म्हणजे महापालिका पदाधिकार्यांचा राबता नसल्याने नागरिकांची वर्दळ कमी झालेली महापालिकेची नवीन विस्तारित इमारत तर वॉकिंग प्लाझा झाली आहे!
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर राज्य सरकारने शासकीय व खासगी कार्यालयातील कर्मचार्यांच्या उपस्थितीवर निर्बंध घातले होते. त्यामुळे महापालिकेतील कर्मचारी व अधिकार्यांसाठी असलेली बायोमेट्रिक हजेरी बंद करून रजिस्टर पद्धतीने हजेरी सुरू केली होती. त्यामुळे कामचुकार व वरिष्ठांना कल्पना न देता कार्यालय सोडणार्यांचे चांगलेच फावत होते. आता बायोमेट्रिक हजेरी करूनही फारसा फरक पडलेला दिसत नाही.
राज्य शासनाने शासकीय कार्यालयांच्या कामकाजासाठी पाच दिवसांचा आठवडा जाहीर केल्यानंतर कामाचे तास वाढविले होते. त्यामुळे कर्मचारी व अधिकार्यांनी 9.30 पूर्वी कार्यालयात येणे व 6.30 नंतर घरी जाणे अपेक्षित होते. मात्र, अनेक अधिकारी व कर्मचारी आपल्या वरिष्ठांना कसलीही कल्पना न देता केव्हाही कार्यालय सोडतात. सर्रासपणे सकाळी उशिरा कार्यालयात येतात, सायंकाळी पाचपासूनच घरी जाण्याची लगबग सुरू असते. त्यामुळे कार्यालये आणि खुर्च्या मोकळ्याच दिसतात. कार्यालयातील पंखे आणि लाईट मात्र सुरूच असतात.
नवीन इमारत झाली वॉकिंग प्लाझा
महापालिका सभागृह विसर्जित झाल्यानंतर पदाधिकार्यांच्या कार्यालयांमधील कर्मचार्यांची विविध विभागांमध्ये नियुक्ती केली आहे. मात्र, हे कर्मचारी नवीन कार्यालयांमध्ये फारसे रमलेले दिसत नाहीत. हे कर्मचारी नवीन इमारतीमध्ये कायम रेंगाळत असलेले पहायला मिळतात. दुसरीकडे दुपारचे जेवण झाल्यानंतर अनेक महिला कर्मचारी फेरफटका मारण्यासाठी नवीन इमारतीच्या दुसर्या मजल्यावर फिरत असतात. हा फेरफटका दोन-दोन तासांचा असतो. फेरफटका महिला कर्मचार्यांचे ग्रुपच्या ग्रुप फिरत असतात. त्यामुळे नवीन इमारतीचा दुसरा मजला एकप्रकारे कर्मचार्यांचा वॉकिंग प्लाझा झाला आहे.