उंडवडी : मका पिकाला मिळतोय चांगला बाजारभाव; चार्‍यासाठी प्रतिगुंठा बाराशे ते तेराशे रुपये | पुढारी

उंडवडी : मका पिकाला मिळतोय चांगला बाजारभाव; चार्‍यासाठी प्रतिगुंठा बाराशे ते तेराशे रुपये

उंडवडी; पुढारी वृत्तसेवा: मका पिकाला सध्या चांगलीच मागणी असून भावही चांगला मिळत आहे. चार्‍यासाठी मका पिकाला प्रतिगुंठा बाराशे ते तेराशे रुपये बाजारभाव मिळत असल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले आहे. पूर्वी मका खाण्यासाठी तसेच मक्याची दाणे बनवून विकण्यासाठी वापर केला जात होता; परंतु सध्या मका पिकाचा वापर जनावरांना चारा तसेच मुरघास बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. परिणामी दिवसेंदिवस मका पिकाची मागणी वाढू लागली आहे. मक्याला गुंठ्याला बाराशे ते तेराशे रुपये प्रतिगुंठा दर मिळत असल्याने शेतकरी वर्गही मका पिक घेण्यावर भर देत आहे.

उंडवडी सुपेसह आजूबाजूच्या परिसरात शेतीसह दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात शेतकरी करतात. दुधाला लिटरला बत्तीस ते पस्तीस रुपये इतका भाव मिळत असल्याने दुग्ध व्यवसाय वाढू लागला आहे. त्यामुळे जनावरांना चारा तसेच मुरघास बनवण्यासाठी मका पिकांचा वापर करावा लागत आहे. मका पिकांना मागणी वाढू लागल्याने आपोआप भावही वाढत असून, मका शेती करण्यावर शेतकरी भर देत असल्याचे चित्र उंडवडी सुपे परिसरात पहायला मिळत आहे.

Back to top button