यवत ग्रा.पं.चे राजकारण कामकाजावरून तापले | पुढारी

यवत ग्रा.पं.चे राजकारण कामकाजावरून तापले

यवत; पुढारी वृत्तसेवा: यवत (ता. दौंड) ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत वादाला तोंड फुटले असून, याचा शेवट नेमका काय होणार, याकडे यवतकरांचे लक्ष लागून राहिले आहे. राजकारण मात्र या प्रकरणावरून चांगलेच तापले आहे. यवत ग्रामपंचायतीच्या कामकाजात अनियमितता असल्याचा आरोप करीत ग्रामपंचायत सदस्य सदानंद दोरगे आणि मनोहर खुटवड यांनी सरपंच समीर दोरगे यांच्यावर कारवाई करावी, अशी लेखी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती.

त्या अर्जाच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी यांनी पुरंदरचे गटविकास अधिकारी अमर माने यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. माने यांनी आपला चौकशी अहवाल जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी यांना दिला असून, त्यात सरपंचांवर ग्रामसभेस विनापरवाना गैरहजर राहणे, शासकीय नियमाप्रमाणे ग्रामसभा न घेणे व कामकाजात आर्थिक अनियमितपणा असणे, असा ठपका ठेवल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य आणि तक्रारदार सदानंद दोरगे यांनी दिली आहे.

याबाबत सरपंच समीर दोरगे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, तक्रारदार यांनी केलेली तक्रार खोटी असून, चौकशी अधिकारी यांनी स्वतः चौकशी न करता दुसर्‍या व्यक्तीमार्फत चौकशी केली आहे तसेच सर्व कागदपत्रे व हिशेब ग्रामपंचायतमध्ये उपलब्ध असून, तो चौकशी अधिकारी यांनी पाहिला नाही.

Back to top button