खडकवासला : आपत्कालीन परिस्थितीत मदतीला येणार रोबोट; वेल्ह्यातील युवा संशोधकांची निर्मिती | पुढारी

खडकवासला : आपत्कालीन परिस्थितीत मदतीला येणार रोबोट; वेल्ह्यातील युवा संशोधकांची निर्मिती

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: वेल्हे येथील अनिकेत मनोज मांढरे व पुण्यातील हर्षिता म्हस्के या नवसंशोधक यांत्रिक अभियंत्यांनी स्वयंचलित रोबोट श्वान विकसित केला आहे. युद्ध, पूर, आग, भूकंप आदी आपत्कालीन परिस्थितीत हा रोबोट वरदान ठरणार आहे. अनिकेत मांढरे यांच्या कुटुंबाची परिस्थिती सर्वसामान्य आहे. अनिकेतचे वडील मनोज मांढरे यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेतले. ते सिव्हिल इंजिनिअर आहेत. अनिकेतला शालेय जीवनापासून यांत्रिक क्षेत्रात संशोधनाची आवड आहे. अनिकेत व हर्षिता यांनी अभियांत्रिकी पदवी घेतली आहे. आठ महिन्यांपासून संशोधन करून दोघांनी रोबोट विकसित केला.

एका अमेरिकन कंपनीच्या रोबोटच्या धर्तीवर हा रोबोट तयार केला आहे. मात्र, या रोबोटच्या हालचाली अधिक गतिमान व अचूक आहेत. त्याचा आकार श्वानाप्रमाणे असल्याने त्याला ‘श्वान’ असे नावही त्यांनी दिले आहे. अनिकेतने सांगितले, की युद्धजन्य, आपत्तीजनक परिस्थितीत भारतीय लष्कर, अग्निशमन दल, प्रशासनाला या रोबोटची मदत होईल. अंतराळ संशोधनासह विविध क्षेत्रांत हा रोबोट उपयुक्त ठरेल. पहिल्या टप्प्यात रोबोट प्राथमिक अवस्थेत आहे. त्यावर अद्यापही संशोधन सुरू आहे.

आठ महिन्यांच्या परिश्रमानंतर यश
शासकीय, तसेच कोणत्याही खासगी संस्थेकडून अनुदान न घेता या दोघांनी आपत्तीजनक परिस्थितीवर नियंत्रण मिळवणारा रोबोट विकसित केला आहे. त्यासाठी त्यांनी देशासह जगभरातील यांत्रिकी क्षेत्रातील संशोधन केले असून, कठोर परिश्रम घेतले आहेत. आठ महिन्यांच्या काळात या दोघांनी स्वतःची बौद्धिक क्षमता, कल्पकतेचा वापर करून कमी खर्चात रोबोट विकसित केला आहे. त्यासाठी एफटीएम थ्रीडी प्रिंटरचा वापर केला आहे. चार पायांच्या प्राण्यांपासून प्रेरणा घेत तयार केलेला हा रोबोट असमतोल जमिनीवर, कोठेही चालणार आहे. या रोबोटला संरक्षण, सुरक्षा, दूरस्थ तपासणी अशी पार्श्वभूमी आहे.

Back to top button