पौडरोड : कंत्राटी सफाई कामगारांचे वेतन रखडले; क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचार्‍यांचे उद्या आंदोलन | पुढारी

पौडरोड : कंत्राटी सफाई कामगारांचे वेतन रखडले; क्षेत्रीय कार्यालयातील कर्मचार्‍यांचे उद्या आंदोलन

पौडरोड; पुढारी वृतसेवा: पुणे महानगरपालिकेच्या कोथरूड- बावधन क्षेत्रीय कार्यालयाकडे सार्वजनिक स्वच्छता विभाग व कचरा वाहतूक विभागात 220 कंत्राटी सफाई कामगार आहेत. या कामगारांचे तीन महिन्यांचे वेतन रखडले असून, मागण्यांसाठी शुक्रवारी (दि.5) आंदोलन करण्यात येणार आहे. जानेवारी 2022 पासून सफाईच्या निविदा मान्य करून घेण्याची प्रक्रियाच पूर्ण होत नसल्याने या प्रशासकीय यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे कंत्राटी सफाई कामगार उपाशी मरतोय. कोणत्याच नेत्याला किवा कोणत्याच सरकारला कंत्राटी सफाई कामगारांच्या प्रश्नाविषयी कणव कशी येत नाही? असा प्रश्न सफाई कामगारांकडून उपस्थित केला जात आहे.

कोथरूड- बावधन क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारीतील 220 सफाई कंत्राटी कामगारांचे मे, जून व जुलै महिन्याचे वेतन अदा करण्यात आलेले नाही. सहा ते सात महिने झाले तरी प्रशासकीय यंत्रणेकडून निविदाच मान्य होत नाहीत. पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या माध्यमातून थकीत वेतन देण्याविषयी पत्र व्यवहारदेखील करण्यात आला आहे.

शिवाय प्रत्यक्षात भेट घेऊन वेतनाविषयी विचारणा केली असता ‘तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत, अडचणी दूर झाल्या की होईल पगार’ किंवा ‘तुम्हाला काम करायचे असेल तर करा, नाही तर येऊ नका कामाला,’ असे अधिकारी उत्तरे देत असल्याचे कंत्राटी कामगारांनी सांगितले. युनियनचे अध्यक्ष उदय भट व जनरल सेक्रेटरी मुक्ता मनोहर यांनी महापालिकेचे प्रशासक- आयुक्त यांना कंत्राटी कामगांराच्या सर्व प्रश्नाच्यासंदर्भात लेखी पत्रव्यवहार केला. बैठकादेखील घेतल्या, तरी पण फक्त आश्वासनाशिवाय काहीच मिळत नाही, असे युनियनच्या निदर्शनास आले आहे.

किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन अदा करण्यात यावे; तसेच किमान वेतनाची थकबाकी द्यावी, दरमहा दहा तारखेच्या आत सर्व कंत्राटी कामगारांचे वेतन अदा करावे, वेतन चिठ्ठी देण्यात यावी, तसेच ‘ईएसआय’चा योग्य नियमित भरणा करावा व पीएफ आणि ईएसआय कार्ड देण्याची पूर्तता करावी, बहुउद्देशीय कामगार अशा नावाखाली नेमणूक करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांना सुरक्षारक्षक कायद्यानुसार पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळात नोंदणी करून काम द्या, सर्व कंत्राटी कामगारांना कायम करा व समान कामाला समान वेतन द्या, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

प्रशासकीय यंत्रणेने गांभीर्याने कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करून न्याय दिला नाही, तर आम्हाला संप करण्याशिवाय पर्याय नाही, असे उदय भट यांनी सांगितले. शुक्रवारी (दि. 5) सकाळी 11 वाजता महानगरपालिकेच्या मुख्य दरवाजासमोर होणार्‍या निदर्शनामध्ये सर्व खात्यातील कंत्राटी कामगांरानी सहभागी व्हावे, असे आवाहन युनियनच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button