पिंपरी : दोन महिन्यांनंतर विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश | पुढारी

पिंपरी : दोन महिन्यांनंतर विद्यार्थ्यांना मिळणार गणवेश

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक अशा बालवाडी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याच्या दोन महिन्यांनंतर शालेय व पीटी गणवेश तसेच, स्वेटर मिळणार आहेत. त्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांची अखेर, मंजुरी दिल्याने उशिरा का होईना विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचा मार्ग मोकळा झाला आहे. पालिकेच्या बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी गणवेश, स्वेटर, रेनकोट, वह्या, कंपास, कार्यपुस्तिका, दप्तर, बूट, मोजे असे साहित्य मोफत दिले जाते. मात्र, शाळा सुरू होऊन दीड महिना उलटले तरी, प्रशासकीय राजवटीत अद्याप विद्यार्थ्यांना साहित्य मिळालेले नाही.

त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांसह विविध पक्षासह सामाजिक संघटनांना तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत. गणवेश व इतर साहित्य खरेदीसाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवायची, शालेय समितीमार्फत शाळानिहाय खरेदी करायची की विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे थेट रक्कम अदा करायची या संदर्भात ठोस निर्णय घेण्यास शिक्षण विभागास विलंब झाला. दरम्यान, प्रशासनाच्या वेळकाढूपणामुळे शालेय साहित्य पुरवठा करणार्‍या तीन ठेकेदारांनी पालिकेच्या विरोधात पुणे दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला.

न्यायालनाने 20 मे रोजीच्या सुनावणीत प्रकरण निकाली काढले. महालक्ष्मी ड्रेसेस अ‍ॅण्ड टेलरिंग फर्म, श्री प्रेस्टीज गारमेट्स अ‍ॅण्ड टेलरिंग फर्म आणि श्री वैष्णवी महिला कॉर्पोरेशन यांच्याकडून सन 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी शालेय व पीटी गणवेश आणि स्वेटर खरेदी करून वाटप करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

शिक्षण मंडळ असताना झालेल्या करारातील अटी व शर्तीनुसार आणि पुणे दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित तीन ठेकेदारांकडून गणवेश व स्वेटर खरेदीसाठी येणार्‍या खर्चास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी बुधवारी (दि.3) मंजुरी दिली आहे. त्यामुळे पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना लवकरच गणवेश व स्वेटर वाटप करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Back to top button