पुणे : ‘ओटीटी व्यासपीठावर मराठी चित्रपट ‘वेटिंग’वरच | पुढारी

पुणे : ‘ओटीटी व्यासपीठावर मराठी चित्रपट ‘वेटिंग’वरच

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ओटीटी व्यासपीठावर हिंदी, इंग्रजी आणि दाक्षिणात्य चित्रपट मोठ्या प्रमाणात प्रदर्शित होत आहेत. परंतु, अजूनही मराठी चित्रपटांना थंड प्रतिसाद आहे. मराठी चित्रपटांना कमी पैसे दिले जात असल्यामुळे ‘ओटीटी’साठी अनेक निर्माता-दिग्दर्शकांचे चित्रपट प्रदर्शनासाठी वेटिंग लिस्टमध्ये आहेत. चित्रपटाच्या निर्मितीसाठी खर्च केलेली निम्मी रकमसुद्धा हातात येत नसल्यामुळे निर्माते-दिग्दर्शकांमध्ये नाराजी आहे. अनेकांनी सोशल मीडियाद्वारे नाराजी व्यक्त केली आहे. ओटीटीवरील नियम आणि अटीही त्याला कारणाभूत असल्याचेही त्यांनी सांगितले.

निर्माते-दिग्दर्शक सागर पाठक म्हणाले, ‘ओटीटी व्यासपीठांकडे मराठी चित्रपटांसाठी ठरावीकच बजेट असतो. त्यामुळे ओटीटी कंपन्यांकडून अर्धवट किंमतच चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी दिली जात आहे. मराठी चित्रपटांचे विषय, गुणवत्ता आणि निर्मिती याकडे कंपन्या पाहतात, तेव्हाच चित्रपट विकत घेतात. मराठी चित्रपटांचे बजेट अधिक असले, तरी त्यातील विषय, गुणवत्ता पाहिली जाते, तेव्हाच तो स्वीकारला जातो. यामुळेच अनेक निर्मात्यांचे चित्रपट स्वीकारले गेलेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे.’

‘माझा एक चित्रपट थ्रीडीमध्ये तयार झाला. ज्याच्या निर्मितीसाठी 40 ते 45 लाख रुपये बजेट खर्च केला; पण ओटीटी व्यासपीठाकडून त्यासाठी फक्त 10 लाख रुपये ऑफर दिली. त्यामुळे मी ओटीटीसाठी चित्रपट दिला नाही. एवढ्या कमी पैशात चित्रपट कोण देणार… म्हणूनच निर्माते-दिग्दर्शक ओटीटीपेक्षा चित्रपटगृहातच चित्रपट प्रदर्शित करत आहेत,’ असे निर्माते डॉ. राजेंद्र खेडेकर यांनी सांगितले.

या आहेत निर्माते-दिग्दर्शकांच्या मागण्या…
ओटीटी व्यासपीठांना चित्रपटाच्या निर्मितीएवढे पैसे द्यावेत.
ओटीटीवर मिळणार्‍या व्ह्युव्जचेही योग्य पैसे दिले जावेत.
मराठी चित्रपटांना मोठ्या ओटीटी व्यासपीठांनीही संधी.

मोठ्या कंपन्यांची ओटीटी व्यासपीठ आहेत. त्यांचे नियम आणि अटी स्पष्ट सांगितल्या जात नाहीत. कायमस्वरूपी चित्रपट घेत असाल, तर निर्मितीसाठीचे पैसे द्या, असे निर्मात्यांचे म्हणणे असते; पण निम्मे पैसे ऑफर केले जातात. माझे चार चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यासाठी मी विचारणा केली होती; पण कमी पैसे ऑफर केले गेले.

                                                                        – मच्छिंद्र धुमाळ, निर्माते

Back to top button