पुणे : ज्येष्ठांच्या फसवणुकीचे धागेदोरे थेट मंत्रालयात | पुढारी

पुणे : ज्येष्ठांच्या फसवणुकीचे धागेदोरे थेट मंत्रालयात

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाला पावणेसहा लाख रुपयांना गंडा घालणार्‍या आरोपीच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने 4 ऑगस्टपर्यंत वाढ केली आहे. आरोपीने फसवणुकीच्या रकमेचा काही भाग मंत्रालयातील आरोग्य विभागातील एका अधिकार्‍याला दिल्याचे तपासात समोर आले आहे. संतोष खुशलचंद तौवर (रा. बिबवेवाडी) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह सज्जन भागुजी गरुड (वय 65, रा. येरवडा) आणि नितीन चव्हाण (वय 40, रा. टिंगरेनगर) यांच्याविरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत 62 वर्षांच्या व्यक्तीने फिर्याद दिली आहे. ही घटना जुलै 2020 ते जुलै 2022 दरम्यान पंचशीलनगर, येरवडा परिसरात घडली. सहायक सरकारी वकील योगेश कदम यांनी आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. आरोपी संतोष तौवरने यापूर्वी तीन मित्रांकडून हातउसने पैसे घेतले होते. ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक करून लाटलेल्या पैशातून मित्रांची उधारी चुकविल्याचे त्याने तपासात सांगितले. याशिवाय फसवणुकीतील काही रक्कम त्याने पत्नी व आईच्या औषधोपचारावर खर्च केल्याचे सांगितले आहे.

Back to top button