पुणे : अकरावी प्रवेशाचा कटऑफ नव्वदी पार; पहिल्या फेरीत पात्रता गुणांमध्ये काहीशी घट | पुढारी

पुणे : अकरावी प्रवेशाचा कटऑफ नव्वदी पार; पहिल्या फेरीत पात्रता गुणांमध्ये काहीशी घट

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत नामांकित महाविद्यालयांतील पात्रता गुण (कटऑफ) गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झाल्याचे दिसून येत आहे. यंदा पहिल्या फेरीचे पात्रता गुण नव्वदीपारच असले, तरी गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल कमी झाल्याने पात्रता गुणांमध्ये काहीशी घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीची गुणवत्ता यादी बुधवारी जाहीर करण्यात आली.

त्यात बृहन् महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात 95 टक्के, फर्ग्युसन महाविद्यालयात कला शाखेसाठी 96.40 टक्के, स. प. महाविद्यालयात विज्ञान शाखेत 92.20 टक्के, कला शाखेसाठी 93.40 टक्के, सिम्बायोसिस महाविद्यालयात कला शाखेसाठी 93.20 टक्के, वाणिज्य शाखेसाठी 91 टक्के, शामराव कलमाडी महाविद्यालयात विज्ञान शाखेसाठी 91.20 टक्के, मॉडर्न महाविद्यालयात विज्ञान शाखेसाठी 91.60 टक्के, आबासाहेब गरवारे महाविद्यालयात विज्ञान शाखेसाठी 90.40 टक्के गुण आवश्यक आहेत.

गेल्या वर्षी दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे निकालाचा टक्का वाढल्याने अकरावीचे पात्रता गुण वाढले होते. तर यंदा दहावीची प्रत्यक्ष परीक्षा झाल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत निकाल काही प्रमाणात कमी झाला. त्यामुळे अकरावीच्या प्रवेशाच्या पात्रता गुणांमध्ये घट झाल्याचे दिसून येत आहे. ‘गेल्या वर्षीच्या तुलनेत विज्ञान आणि वाणिज्यचे पात्रता गुण एक ते दीड टक्क्याने कमी झाले आहेत, तर कला शाखेच्या इंग्रजी माध्यमाचे पात्रता गुण वाढले आहेत,’ असे मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांनी सांगितले.

Back to top button