पुणे : पर्यटकांनो, उद्यापासून पर्यटनस्थळे पाहा मोफत | पुढारी

पुणे : पर्यटकांनो, उद्यापासून पर्यटनस्थळे पाहा मोफत

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पर्यटकांना दि. 5 ऑगस्ट ते 15 ऑगस्टपर्यंत शनिवारवाडा, आगाखान पॅलेस, कार्ल्याची लेणी, शिवनेरी, पाताळेश्वर लेणी आदी ऐतिहासिक स्थळे, स्मारके येथे विनाशुल्क प्रवेश मिळणार आहे. ‘आजादी का अमृत महोत्सव’अंतर्गत भारतीय पुरातत्व खात्याकडून निर्णय घेण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत भारतीय पुरातत्व खात्याच्या पुणे विभागातर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे, तसेच आगाखान पॅलेस येथे सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत.

याबाबत भारतीय पुरातत्व खात्याच्या पुणे विभागाचे संरक्षक संवर्धक गजानन मंडावरे म्हणाले, ‘नागरिकांना ‘आजादी का अमृत महोत्सव’ उपक्रमाचा आनंद घेता यावा, याकरिता ऐतिहासिक स्थळे, स्मारके येथे मोफत प्रवेश दिला जाणार आहे. केंद्र सरकारने देशभरातील शंभर स्मारकांची निवड केली असून, त्यामध्ये आगाखान पॅलेसचाही समावेश आहे. त्यामुळे तेथे सांस्कृतिक कार्यक्रम होतील. तेथे पन्नास फूट उंच तिरंगा ध्वज फडकविण्यात येईल. दरम्यान, केंद्र सरकारने ‘आजादी का अमृत महोत्सव’अंतर्गत देशभरातील सर्व ऐतिहासिक स्थळे, स्मारके दहा दिवस नागरिकांना मोफत पाहण्यासाठी खुली करण्याचा आदेश काढला आहे.

Back to top button