पुणे, पुढारी वृत्तसेवा : घरातून बेपत्ता झालेल्या महिलेचा खून झाल्याची घटना पर्णकुटी पायथा येरवडा परिसरात घडली. गीता राजेशकुमार कुंभार (वय 46, रा. ठाकरसी पाण्याच्या टाकीजवळ, पर्णकुटी पायथा, येरवडा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. खुनामागचे कारण समजू शकले नसून पोलिस तपास करत आहेत.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद खटकेयांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिता यांचे पती राजेश कुंभार हे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात काम करतात. गिता यांचे मानसिक स्वास्थ ठिक नसल्यामुळे त्या यापुर्वी अनेकदा घरातून निघून गेल्या आहेत. त्यांना तीन मुली असून, एक मुलगा आहे. शनिवारी (दि.30) गिता ह्या त्यांच्या मुलीसोबत खेडशिवापूर येथून आल्या होत्या. मुलीने त्यांना घरी आणून सोडले होते. रात्री साडे अकरावाजता त्यांची मुलगी आपल्या घरी निघून गेली. मात्र रविवारी (दि.31) पहाटे दिड वाजता गिता परत घरातून निघून गेल्या.
घरातील लोकांना वाटले नेहमीप्रमाणे येईल परत. परंतू तसे झाले नाही. पहाटे चार वाजेपर्यंत गिता परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यात दिसत आहेत. सोमवारी (दि.1) गिता यांचा मृतदेह येथील ठाकरसी पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या झाडीत अडगळीच्या जागेत सापडला. त्यांच्या डोक्यात कठीण वस्तुने प्रहार करण्यात आला असून त्यांचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे.
मृतदेहाजवळ एक पिशवी मिळून आली. त्यामध्ये गिता यांची कागदपत्रे होती. त्यावरून त्यांची ओळख पटवण्यात आली. याप्रकरणी सुरूवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. शवविच्छेदन अहवालांनंतर त्यांचा खून झाल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. गीता यांच्या खुनामागचे कारण समजू शकले नसून येरवडा पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे तपास करत आहेत.