पुणे : पोलिस असल्याचे सांगून फसवणूक | पुढारी

पुणे : पोलिस असल्याचे सांगून फसवणूक

बारामती, पुढारी वृत्तसेवा : मी पोलिस आहे, काल रस्त्यावर तस्करांना मालासह पकडले आहे, काहीजण फरार असून त्यांचा शोध घेण्यासाठी आम्ही मालाची तपासणी करीत आहोत, असे सांगत एका तोतयाने सेवानिवृत्ताची फसवणूक केली. त्याच्या अन्य एका साथीदारानेही त्याला या कामी मदत केली. या प्रकरणी दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत सेवानिवृत्त शिक्षकाकडील 67 हजारांचा माल चोरट्यांनी लांबविला.

याप्रकरणी विठ्ठल सोपान महादार (वय 72, रा. नवमहाराष्ट्र विद्यालयाशेजारी, पणदरे, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली. दि. 30 जुलै रोजी बारामतीत भिगवण चौक ते सिल्व्हर ज्युबिली हॉस्पिटल या रस्त्यावर ही घटना घडली.

फिर्यादीची मुलगी बारामतीत एका विद्यालयात शिक्षिका आहे. तिला सोडण्यासाठी ते रोज बारामतीला येत असतात. दि. 30 रोजी नेहमीप्रमाणे मुलीला शाळेत सोडवून ते एका बँकेजवळ घड्याळाचे सेल बदलण्यासाठी गेले. परंतु, दुकान बंद असल्याने ते परत निघाले. रिक्षा थांब्याशेजारी दुचाकीवरून आलेल्या एकाने त्यांना थांबवले. त्याने, मी पोलिस आहे. रात्री या भागात तस्करांना मालासह पकडले आहे, काही लोक फरार असून आम्ही मालाची तपासणी करत आहोत, असे सांगत कसले तरी ओळखपत्र दाखवले. तपासणीच्या नावाखाली फिर्यादीकडील पिशवी घेतली. चौकशी करत आहे, असे भासवून फिर्यादीचे लक्ष विचलित केले. हातातील घड्याळ व खिशातील पाकिट काढायला सांगितले. त्यानंतर रुमालाची मागणी केली.

फिर्यादीने रुमाल नसल्याचे सांगितल्यावर तेथे दुसरा एक व्यक्ती आला. त्याने स्वतःचा रुमाल काढत अंगठी त्यात काढून देत या भामट्याकडे दिली. त्यानंतर त्याच रुमालात फिर्यादीला अंगठी व साखळी काढून ठेवण्यास सांगितले. तो रुमाल फिर्यादीच्या पिशवीत टाकला. त्यानंतर ते निघून गेले. फिर्यादीने पिशवीतील रुमाल पाहिला असता त्यात दागिने नसल्याचे दिसून आले.

Back to top button