पिंपरी : आयाराम शिवसेनेत टिकाव नाही धरत, बारणे यांच्या उदाहरणावरून पुन्हा सिद्ध | पुढारी

पिंपरी : आयाराम शिवसेनेत टिकाव नाही धरत, बारणे यांच्या उदाहरणावरून पुन्हा सिद्ध

नंदकुमार सातुर्डेकर :

पिंपरी : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठेचा सूर आळवत व नाही, नाही, म्हणत खासदार श्रीरंग बारणे अखेर एकनाथ शिंदे गटात सामील झाले. मात्र, बारणे यांच्या या भूमिकेमुळे आयाराम शिवसेनेत टिकत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. खरेतर बारणे हे मूळचे काँग्रेसचे. त्यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष, विरोधी पक्षनेतेपद भूषविले. नंतर शिवसेनेत प्रवेश केलेल्या श्रीरंग बारणे यांनी सन 2009 मध्ये चिंचवड मतदार संघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली.

मात्र, लक्ष्मण जगताप यांच्याकडून ते पराभूत झाले. त्यानंतर त्यांना दोनदा खासदार म्हणून सेनेतर्फे संधी मिळाली. सन 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेने तत्कालीन खासदार गजानन बाबर यांना डावलून बारणे यांना उमेदवारी दिली. बारणे यांनी शेकापच्या तिकिटावर रिंगणात उतरलेल्या आ. लक्ष्मण जगताप यांना पराभूत केले. बारणे यांना पाच लाख 12 हजार 226 तर, जगताप यांना तीन लाख 54 हजार 829 मते मिळाली. सन 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने पार्थ पवार यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत बारणे हे सात लाख वीस हजार 663 मते मिळवून विजयी झाले. पार्थ पवार यांना पाच लाख चार हजार 750 मते मिळाली.

राज्यात घडलेल्या राजकीय महानाट्यानंतर आपण उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचे बारणे यांनी सांगितले होते. मात्र, नंतर ते शिंदे गटात सामील झाले. शहर शिवसेनेचा इतिहास पाहिला तर माजी आमदार गौतम चाबुकस्वार, माजी विरोधी पक्षनेते दत्ता वाघेरे यासारखे एक दोन अपवाद वगळता आयाराम गयाराम शिवसेनेत टिकत नसल्याचे सिद्ध झाले आहे. काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करून अमर मूलचंदानी यांनी महापालिका शिक्षण मंडळाचे सदस्यपद पटकावले. मात्र नंतर, ते काँग्रेस व पुढे भाजपमध्ये सामील झाले. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या नानासाहेब बलकवडे यांना शिवसेनेने पिंपरी चिंचवडसह जिल्हा प्रमुखपद बहाल केले. मात्र, ते पुन्हा राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेल्या उमेश चांदगुडे यांना शिवसेनेने जिल्हाप्रमुख केले. मात्र पुढे त्यांचे जिल्हाप्रमुख पद काढून घेतल्यानंतर तेही शिवसेनेत दिसले नाहीत.

काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले गजानन चिंचवडे यांना शिवसेनेने जिल्हाप्रमुख पद दिले. त्यांच्या पत्नी अश्विनी चिंचवडे या शिवसेनेच्या तिकिटावर दोनदा निवडून आल्या. मात्र अश्विनी चिंचवडे यांना गटनेतेपदी तसेच स्थायी समिती सदस्यपदी संधी न दिल्याने गजानन चिंचवडे, त्यांच्या पत्नी अश्विनी चिंचवडे यांनी भाजपात प्रवेश केला. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करून उपशहर प्रमुखपदी नियुक्ती झालेले श्याम लांडे तसेच विनायक रणसुभे तसेच मागील निवडणुकीत राष्ट्रवादीतून शिवसेनेत येऊन उमेदवारी मिळविलेल्या सुरेखा लांडगे हे सगळे स्वग्रही म्हणजे राष्ट्रवादीत परतले. एकूणच सारी उदाहरणे पाहता शिवसेनेत आयाराम टिकत नसल्याचे समोर आले आहे.

कट्टर सैनिक परत
दिवंगत माजी खासदार गजानन बाबर यांनी 2014 मध्ये उमेदवारी नाकारली जाताच शिवबंधन तोडले, मनसेत प्रवेश केला. पण ते तिथे रमले नाहीत. मला केवळ शिवसैनिक म्हणून मरायचे आहे, असे म्हणत त्यांनी सेनेत प्रवेश केला. त्यांचे बंधू मधुकर बाबर हेही मनसे आणि भाजप असा प्रवास करून पुन्हा शिवसेनेत परतले. हृदयविकाराने नुकतेच त्यांचे निधन झाले. मात्र कट्टर सैनिक शिवसेनेबाहेर टिकत नाही हेही यावरून सिद्ध झाले.

Back to top button