पालखी सोहळ्यात चोरी करणार्‍या टोळीला बेड्या | पुढारी

पालखी सोहळ्यात चोरी करणार्‍या टोळीला बेड्या

पुणे : पुढारी वृत्तसेवा : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आलेल्या भाविकांच्या सोनसाखळ्या हिसकावणार्‍या अहमदनगरमधील पाथर्डी येथील टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. 24 तोळे वजनाचे 12 लाख 24 हजारांचे दागिने जप्त करण्यात आले. पुणे शहरासह पिंपरी-चिचवड आयुक्तालय हद्दीत केलेले जबरी चोरीचे 18 गुन्हे उघडकीस आले आहेत. शंकर शिवाजी पवार (23), सुरेश अरगडे (26), नितीन छगन काकडे (22) आणि सोने खरेदी करणारा प्रशांत छगन टाक (26, सर्व रा. पाथर्डी, अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या टोळक्याचे नाव आहे.

गुन्हे शाखेचे युनिट 6 चे पथक त्यांचा शोध घेत होते. त्यावेळी पथकाला गुन्ह्यात सहभाग असलेले दोन संशयित आरोपी शंकर पवार आणि अरगडे हे आळंदी रोड येथे थांबल्याची खबर मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश माने यांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले.

पालखी सोहळ्यात जबरी चोरी करणार्‍या आरोपींचा शोध सुरू असताना आम्हाला दोन संशयित आरोपींची सुरुवातीला माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या साथीदारासह ज्याच्याकडे सोने विकले होते, त्या सोनाराला आम्ही अटक केली. अटक केलेल्या चौघांकडून 18 गुन्हे उघडकीस आले आहेत.
                                                        – गणेश माने, युनिट 6, गुन्हे शाखा

Back to top button