पुणे : रुग्णांना सवलतीत उपचार नाकारताय ? याद राखा! | पुढारी

पुणे : रुग्णांना सवलतीत उपचार नाकारताय ? याद राखा!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : खासगी रुग्णालयांनी महापालिकेच्या मालकीच्या जागांवर सुसज्ज इमारती उभारल्या. त्या बदल्यात गरजू आणि गरीब रुग्णांना वैद्यकीय सुविधा मोफत अथवा कमी दरात उपलब्ध व्हाव्यात, यासाठी चार खासगी रुग्णालयांनी महापालिकेशी करारनामा केला. मात्र, गेल्या चार वर्षांतील आकडेवारी पाहता या सुविधेचा लाभ फार कमी रुग्णांना घेता आला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी रुग्णालये आणि महापालिका यांच्यात समन्वय असला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

खाटा उपलब्ध असतानाही एखाद्या गरजू रुग्णाला उपचार नाकारल्यास करारनामा रद्द करण्यात येईल, असे पत्र महापालिकेच्या वतीने रुग्णालयांना दिले जाणार आहे. चार खासगी रुग्णालयांनी महापालिकेबरोबर करारनामा केला आहे. रुग्णालयांनी किती मोफत खाटा उपलब्ध आहेत, याचा तपशील सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये तसेच संबंधित रुग्णालयांत दर्शनी भागावर लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णालयांत किती मोफत खाटा रिक्त आहेत, किती खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत आदींचा तपशील दररोज संबंधित रुग्णालयांनी महापालिकेला कळविणे अपेक्षित आहे. दुसरीकडे, दररोज याबाबतचा तपशील तपासणारी यंत्रणा पालिकेत बसणे आवश्यक आहे.

गरजू रुग्णांना महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पत्र दिले जाते. एक लाखापेक्षा कमी उत्पन्न, शहरी गरीब कार्ड किंवा पिवळे रेशन कार्डधारक असलेल्या महापालिका हद्दीतील रहिवाशांना या सुविधेचा लाभ घेता येतो. खाटा उपलब्ध असतानाही रुग्णांना उपचारांसाठी नकार दिल्यास करारनामा रद्द करण्यात येईल.
                                      – डॉ. आशिष भारती, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका

एम्स हॉस्पिटल औंध : 8 बेड
एम्स हॉस्पिटलमध्ये कार्डिओलॉजी व कार्डिअ‍ॅक सर्जरी विभाग सोडून बेड चार्जेस, कन्सल्टिंग चार्जेस, डायग्नोस्टिक टेस्ट या सर्वांसाठी रुग्णांना 100 टक्के सवलत; परंतु औषधे, डिस्पोजेबल्स, इम्प्लांट्स, स्टेंट्स हा खर्च संबंधित रुग्णाने करायचा आहे. प्रत्येक वर्षी 50 अँजिओग्राफी (5 हजार रुपये दरात एक) आणि 12 अँजिओप्लास्टीत एका स्टेंटसाठी (50 हजार रुपये दरात एक) ही सुविधा आहे. तर, एकापेक्षा जास्त स्टेंटचा खर्च संबंधित रुग्णाला करावा लागेल. प्रत्येक वर्षी 20 बायपास शस्त्रक्रिया (70 हजार रुपये दरात) व्हॉल्व्हचा खर्च रुग्णाला करावा लागणार आहे.

येथे आहेत ‘फ्री बेड’ 

सह्याद्री हॉस्पिटल, डेक्कन : 5 बेड

सर्वसाधारण कक्षामध्ये मेडिकल मॅनेजमेंटसाठी
रुबी हॉल क्लिनिक : 12 बेड

सर्वसाधारण कक्षामध्ये मेडिकल मॅनेजमेंटसाठी
के. के. आय. इन्स्टिट्यूट (बुधरानी हॉस्पिटल) कोरेगाव पार्क : 9 बेड
केवळ डोळ्यांच्या आजारांकरिता

Back to top button