‘जलजीवन’मध्ये पुणे जिल्हा आघाडीवर | पुढारी

‘जलजीवन’मध्ये पुणे जिल्हा आघाडीवर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी देण्याचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये पुणे काही बाबतीत आघाडीवर आहे. त्यामध्ये राज्यात जलजीवनच्या प्रशासकीय मान्यतेत आणि सविस्तर प्रकल्प अहवालामध्ये चौथ्या क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

तसेच अमृत महोत्सव कालावधीदरम्यान हर घर नल से जल ही विशेष मोहीम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा काम करत आहे. त्यामध्ये जिल्हा समाधानकारक काम करत असल्याचे प्रसाद यांनी सांगितले. तसेच तांत्रिक मंजुरीमध्ये पाचवा, निविदा मागविण्यामध्ये सहावा, कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) मध्ये आठवा, तर कामे प्रगतीपर असलेल्यांमध्ये राज्यात तिसर्‍या क्रमांकावर आहे.

सध्या अमृत महोत्सवानिमित्त विशेष मोहिमेदरम्यान प्रत्येक कुटुंबांना जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा प्रतिदिन प्रतिव्यक्ती 55 लिटर प्रमाणे केला जाणार आहे. यासाठी प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. गावातील सर्व कुटुंब शाळा, अंगणवाडी या ठिकाणी स्वतंत्र नळ जोडणी करून तिथे पाणीपुरवठा उपलब्ध करून देत असल्यास तसा ग्रामपंचायतचा ठराव करणे, तसेच कुटुंबांना नळ जोडणीद्वारे पाणीपुरवठा होत असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

Back to top button