पुणे : पोह्याला बसली आता महागाईची फोडणी | पुढारी

पुणे : पोह्याला बसली आता महागाईची फोडणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कच्चा मालाचा तुटवडा निर्माण झाल्याने पोह्याचे दर वधारले आहेत. घाऊक बाजारात महिनाभरात पोह्याचे दर क्विंटलमागे चारशे ते पाचशे रुपयांनी वाढल्याने किरकोळ बाजारात एका किलोचे भाव 42 ते 48 रुपयांपर्यंत पोहचले आहेत.
गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणावर, तर कोकणातील रोहा आणि पेण परिसरात थोड्याफार प्रमाणात पोह्यांचे उत्पादन होते. सध्या या पोह्यांसाठी लागणार्‍या कच्च्या मालाचा (धान किंवा पॅडी) तुटवडा जाणवत आहे.

काही ठिकाणी पावसामुळे पिकाचे नुकसान झाले आहे. मागणी मोठी असल्याने स्थानिक बाजारपेठांतील उत्पादक तसेच प्रक्रिया उद्योजकांनी (मिल) दरात वाढ केली आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात पोह्याच्या प्रतिक्विंटलला 3 हजार 600 ते 4 हजार 300 रुपये भाव मिळत आहे. हवामानामुळे दर टिकून राहील, असा अंदाज आहे. घरगुती ग्राहकांसह उपाहारगृहचालक, खाद्यपदार्थ विक्रेते यांच्याकडून पोह्यांना मोठी मागणी आहे. कच्च्या मालाचा तुटवडा, लहरी हवामानाचा फटका तसेच पाच टक्के जीएसटीमुळे पोह्यांच्या दरात वाढ झाली आहे.

Back to top button