भामा आसखेड : गोठ्यातील जनावरांवर बिबट्याचा हल्ला | पुढारी

भामा आसखेड : गोठ्यातील जनावरांवर बिबट्याचा हल्ला

भामा आसखेड : पुढारी वृत्तसेवा : खेड खुर्द (ता.खेड) येथील शेतकरी विलास नामदेव लिंभोरे यांच्या गोठ्यात शिरून बिबट्याने जनावरांवर हल्ला केल्याची घटना (दि.२) रात्री आठ वाजता घडली आहे. या घटनेत बिबट्याच्या चावेने जनावरे जखमी झाली आहेत.
भक्ष्य साध्य करण्यासाठी आपले क्षेत्र सोडून बिबट्यासह हिंस्र प्राण्यांचे मानवी वस्तीत येण्याचे प्रमाण वाढले आहे. वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. आसखेड खुर्द व आसखेड बुद्रुक या दोन गावात बिबट्याच्या हल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

येथील काळूराम गुंजाळ यांना (दि.१९ जुलै) रात्री बिबट्या नदीवरील पुलाच्या रस्त्यावर फिरताना दिसला. त्यानंतर अवघ्या पाच दिवसांनी आसखेड बुद्रुक येथील शेतकऱ्यांच्या शेळ्यांवर लांडग्याने दुपारपासून सायंकाळ पर्यंत तीन हल्ले करून दोन शेळ्या ठार व काही शेळ्या जखमी झाल्याची घटना (दि.२३ जुलै) रोजी घडली होती. ही घटना ताजी असतानाच मंगळवार (दि.२) विलास लिंभोरे यांचे घराशेजारील गोठ्यात बांधलेल्या म्हैस व पारडावर बिबट्याने रात्री हल्ला करून ठार मारण्याचा उद्देशाने जनावरांच्या मानेवर चावा घेतला. चाव्यामुळे जनावरे जखमी झाली आहेत. बिबट्याच्या सततच्या दर्शनाने आणि पशुधनावरील हल्ल्याने या परिसरातील शेतकरी वर्ग अक्षरशः भयभीत झाला आहे.

२० दिवसात बिबट्या व लांडग्याने हल्ल्याच्या दोन घटना घडूनही वन विभागाकडून कसलीही हालचाल नाही. सध्या शेतातील पिकांची खुरपण,पाळी घालणे आदी कामे सुरू आहेत. परंतु बिबट्याच्या हल्ल्याच्या भीतीपोटी शेतात मजूर वर्ग कामाला येत नाही. पिकांची खुरपण न झाल्याने तण उगवण्याचे प्रमाण वाढले आहे. आसखेड खुर्द व बुद्रुक या दोन्ही गावच्या परिसरात ऊसाचे क्षेत्र आहे. बिबट्याच्या क्षेत्रात त्याला आपले भक्ष्य मिळत नसल्याने भुकेपायी हिंस्र प्राणी आता मानवी वस्तीकडे वळू लागल्याने नागरिकांना याचा धोका अधिक आहे.

Back to top button