पुणे : पुढारी वृत्तसेवा : कोरोनामुळे मागील वर्षी नाट्यगृहे ऑक्टोबरपर्यंत बंद होती; पण ऑक्टोबरनंतर महापालिकेची नाट्यगृहे सुरू झाल्यावर नाट्यगृहांमार्फत मिळणारे उत्पन्नही रुळावर आले आहे. पालिकेच्या सर्व नाट्यगृहांचे मिळून ऑक्टोबर 2021 ते मार्च 2022 या सहा महिन्यांत 83 लाख 30 हजार 302 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गणेश कला क्रीडा मंच, बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक या नाट्यगृहांमार्फत मिळालेले उत्पन्न सर्वाधिक आहे.
कोरोनामुळे काही नाट्यगृहे बंद असल्याने 2020 आणि 2021 मध्ये पालिकेच्या नाट्यगृहांचे उत्पन्न घटले होते आणि नाट्यगृहांच्या वार्षिक उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला; पण आता परिस्थिती सुधारत असून, नाट्यप्रयोग, संगीत महोत्सव, नृत्य महोत्सव आदी कार्यक्रमांची संख्या वाढल्याने नाट्यगृहांमार्फत मिळालेले उत्पन्नही चांगले आहे. ऑक्टोबर 2021 ते मार्च 2022 या सहा महिन्यांत गणेश कला क्रीडा मंचामार्फत 33 लाख 74 हजार 209 रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले, तर बालगंधर्व रंगमंदिरामार्फत 17 लाख 35 हजार 084 रुपये, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामार्फत 11 लाख 52 लाख 581 रुपये आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारकमार्फत (बिबवेवाडी) 6 लाख 48 हजार 797 रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. या चारही नाट्यगृहांमध्ये सध्या सर्वाधिक कार्यक्रम होत असून, नाट्यगृहांच्या तारखांचे बुकिंगही हाउसफुल आहेत.
ऑक्टोबर 2021 ते मार्च 2022 या सहा महिन्यांत नाट्यप्रयोगांच्या आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या भाडेआकारणीनुसार 83 लाख 30 हजार 302 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. कोरोनामुळे नाट्यगृहे बंद असल्याचा फटका नाट्यगृहांना बसला; पण सध्या कार्यक्रमांची संख्या वाढल्यामुळे आता परिस्थिती रुळावर येत आहे, असे नाट्यगृहातील अधिकार्यांनी सांगितले.