पुणे : आता ‘आव्वाज’! पाच दिवस घुमणार | पुढारी

पुणे : आता ‘आव्वाज’! पाच दिवस घुमणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘पुणे शहर आणि परिसरात असलेल्या गणेश मंडळांना शेवटचे पाच दिवस रात्री बारा वाजेपर्यंत देखावे आणि ध्वनिक्षेपक सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुख्यमंत्री शिंदे आणि शहरातील गणेश मंडळांचे पदाधिकारी यांची मंगळवारी रात्री पोलिस आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. या वेळी शहरातील गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांसमोर विविध समस्यांचा पाढा वाचला.

पदाधिकार्‍यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘गणेश मंडळांना मंडप टाकण्याची परवानगी लवकरात लवकर मिळेल. परवानग्या वन विंडो क्लीअरन्स (एकाच ठिकाणी) मिळतील. त्याचबरोबर तात्पुरते वीजमीटर बसविण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष घालावे. सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा.’ मंडप टाकण्याचे शुल्क माफ करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. गणेश विसर्जनादिवशी रात्री बारानंतर सर्व ध्वनिक्षेपक यंत्रणा बंद राहील, दुसर्‍या दिवशी सकाळी सहा वाजल्यानंतर स्पीकर वाजविण्यास परवानगी देण्यात आली आहे. उत्सवाच्या काळात पथारी व्यावसायिकांना हटवू नका, असेही आदेश त्यांनी या बैठकीत पोलिसांना दिले.

पोलिस योग्य ती कारवाई करतील
आमदार उदय सामंत यांच्यावर हल्ला केल्याबाबत पत्रकारांनी मुख्यमंत्री शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, अशा प्रकारे भ्याड हल्ला होत असेल तर ते बरोबर नाही. यामुळे कायदा आणि सुव्यवस्था हल्लेखोर बिघडवत असतील तर पोलिस योग्य ती कारवाई करतील. जे-जे चिथावणीखोर भाषा वापरत असतील तर पोलिस तपासणी करून कारवाई करतील, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

शेतकर्‍यांना मदत जाहीर
राज्यातील दुष्काळी स्थितीबाबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यपालांना पत्र देऊन लक्ष घालण्याची विनंती केली आहे. याबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेऊन शेतकर्‍यांना मदत जाहीर करण्यात आली आहे.

Back to top button