पुणे : पाईट-पिंपरी गटात अनेक महिलांच्या नावांची चर्चा | पुढारी

पुणे : पाईट-पिंपरी गटात अनेक महिलांच्या नावांची चर्चा

भामा आसखेड, पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्यातील पाईट-पिंपरी बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी निश्चित झाले आहे. सलग 20 वर्षे या गटावर निर्विवाद वर्चस्व या गटाचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांचे राहिल्याने हा गट त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. 2022 ते 2027 या पंचवार्षिक काळासाठी हा गट सर्वसाधारण महिला राखीव झाल्याने बुट्टे पाटील यांची संधी हुकली. आता याच गटातून निवडणूक लढविण्यासाठी अनेक महिलांच्या नावांची चर्चा होऊ लागली आहे. पाईट-पिंपरी गट व गणातून निवडणूक लढविण्यासाठी अनेक जण तयारीला लागले आहेत.

या गटातून 2002, 2007 राष्ट्रवादी पक्ष व 2017 या पंचवार्षिक निवडणुकीत बुट्टे पाटील भाजपच्या तिकिटावर विजयी झाले. तर, 2012 या पंचवार्षिकला हा गट अनुसूचित जमाती महिला राखीव झाला असता बुट्टे पाटील यांनी आपल्या मोठ्या कौशल्याने या गटातून सुरेखा ठाकर या महिलेला बिनविरोध निवडून आणल्याने तत्कालीन पालकमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे बुट्टे पाटील यांचे अभिनंदन करताना म्हणाले होते की, माझ्या बारामती तालुक्यात मला जि. प.चा गट बिनविरोध करता आला नाही.

पाईट-पिंपरी बुद्रुक हा गट सर्वसाधारण महिला झाल्याने बुट्टे पाटील यांची संधी गेली. गटातील प्रत्येक गावासह वाडीवस्तीवर विकासाची गंगा आणून त्यांनी हा गट जिल्ह्यात विकासाचे मॉडेल बनविला आहे. 2017 च्या पाईट-पिंपरी पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचे शरद बुट्टे पाटील निवडून आले. त्यांनी शिवसेनेचे कैलास गाळव, राष्ट्रवादीचे माणिक कदम व काँग्रेसचे उमेदवार डॉ. राजेंद्र कारले या तीनही उमेदवारांचा पराभव केला. बुट्टे पाटील यांच्यासह भाजपच्या तिकिटावर पाईट गणातून चांगदेव शिवेकर व पिंपरी बुद्रुक राखीव गणातून धोंडाबाई खंडागळे निवडून आल्या. परंतु, खंडागळे यांनी अचानक राजीनामा दिल्याने झालेल्या पोटनिवडणुकीत सेनेचे मच्छिंद्र गावडे निवडून आले होते.

रचनेत बदल झाल्याने करावीलागणार पराकाष्ठा

गट व गणांच्या रचनेत या गटातील अनेक गावे नव्याने अस्तित्वात आलेल्या आंबेठाण-महाळुंगे गटात जवळपास दहा ते बारा गावे गेली आहेत. तर, अन्य गटांतील काही गावे या गटात समाविष्ट केल्याने या गटरचनेत या गटाचे तीन तुकडे झाले आहेत. त्यामुळे हा गट पुन्हा आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी बुट्टे पाटलांना मोठी पराकाष्ठा करावी लागणार आहे. मागील काही काळात आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी अनेक गावांत विकासकामे केल्याने गावागावांत त्यांना मानणार्‍या कार्यकत्र्यांची फळी आहे. शिवसेनेची देखील ताकद या गटात आहे.

पाईट-पिंपरी बुद्रुक गटातून शरद बुट्टे पाटील यांच्या पत्नी सुनीता बुट्टे पाटील, पाईटच्या माजी सरपंच व खेड तालुका खरेदी-विक्री संघाच्या संचालिका अश्विनी रौंधळ, शिवे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच निर्मला कोळेकर, वाकी बुद्रुकच्या सरपंच वैशाली जरे, संतोषनगरच्या सरपंच अरुणा शरद कड पाटील आदी महिलांच्या नावांची चर्चा होत आहे. पाईट गण हा नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव झाला असून, या गणातून निवडणूक लढविण्यासाठी पंचायत समितीचे माजी सदस्य चांगदेव शिवेकर, रोहिदास गडदे, देविदास बांदल, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष जयसिंग दरेकर, माजी सरपंच बळवंत डांगले, हिरामण रौंधळ, रामदास खेंगले, माजी सरपंच गौतम आवारी यांच्या नावाची चर्चा होत आहे.

पिंपरी बुद्रुक पंचायत समितीचा गण सर्वसाधारण महिला असून, या गणातून निवडणूक लढविण्यासाठी कोरेगाव बुद्रुकचे उपसरपंच रोहित डावरे पाटील यांच्या पत्नी आयटी इंजिनिअर गौरी डावरे, कुरकुंडीच्या स्वप्नाली नितीन भोकसे, चांदुसच्या सरपंच रूपाली कारले, पिंपरीच्या सरपंच मोनाली नीलेश ठाकूर, अरुणा कड.

Back to top button