पिंपरी: वाकड परिसरातील नागरिक धुळीमुळे हैराण | पुढारी

पिंपरी: वाकड परिसरातील नागरिक धुळीमुळे हैराण

वाकड : परिसरात पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांमध्ये जमा झालेली माती वाहन चालविताना डोळ्यांमध्ये जात असल्यामुळे चालक त्रस्त झाले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी वाकड परिसरात मुसळधार पाऊस झाला होता. त्यामुळे परिसरात सर्वत्र धूळ पसरली आहे. पावसाने वाहून आलेली धूळ, मातीचे कण उडून वाहनचालकांच्या डोळ्यांत जात असल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. धूळ डोळ्यात गेल्याने वाहनावर लक्ष विचलित होत असून अपघात होण्याची दाट शक्यता असल्यामुळे नागरिक या धुळीने हैराण झाले आहेत. वाकड परिसरात सध्या पावसाने उघडीप दिली असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. आता नागरिकांना धुळीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. तर, दुसरीकडे पावसामुळे शहरातील खड्ड्यांची दाणादाण उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिककेने अनेक भागातील खड्डेही बुजवले आहेत.

पालिकेने खड्डे तर बुजवले आहेत. मात्र, वाहनांमुळे पुन्हा एकदा खड्डा भरलेली खडी बाहेर पडू लागली आहे. त्याचेच धुलिकण डोळ्यांत जात असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामधून मार्ग काढताना दुचाकी चालक व नागरिकांना तारेवरचे कसरत करावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी रस्त्याची साफसफाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

Back to top button