पुणे : पिस्तूल तस्करांचा शहरात वावर वाढला; आठ गावठी पिस्तुले, 23 काडतुसे जप्त | पुढारी

पुणे : पिस्तूल तस्करांचा शहरात वावर वाढला; आठ गावठी पिस्तुले, 23 काडतुसे जप्त

पुणे; पुढारी वृत्तसेवा: विमानतळ पोलिस व गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत तिघा तस्करांकडून तब्बल आठ गावठी पिस्तुले व 23 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच वेळी पिस्तुले सापडल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. पुण्यात गावठी पिस्तुले विक्रीसाठी आलेल्या एका सराईताला विमानतळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून पाच गावठी पिस्तुले, 14 काडतुसे, असा 2 लाख 26 हजार रुपयांचा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.

राहुल गोपाळ गवळी (वय 35, रा. बारीवाडा, ता. चोपडा, जि. जळगाव) असे त्याचे नाव आहे. गवळी हा रेकॉर्डवरील शस्त्र तस्कर असून, त्याच्यावर बेकायदा पिस्तूल विक्रीचे विविध ठिकाणी गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. रविवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास विमानतळ पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक रवींद्र ढावरे, कर्मचारी सचिन जाधव व प्रदीप मोटे, गिरीश नानेकर, संजय असवले यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, मंगेश जगताप यांच्या सूचनेनुसार पथकाने गवळीला सापळा रचून पकडले. त्याच्याकडे चौकशी करून अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ मोठा शस्त्रसाठा मिळून आला. ही कामगिरी पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलिसांनी केली.

गुन्हे शाखेच्या दरोडाविरोधी पथकाने देखील तीन गावठी पिस्तुले, 9 जिवंत काडतुसे, 4 सुट्टे मॅग्झिन असा 6 लाख 24 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी अजय ऊर्फ महाराज कमलाकर भोरे (वय 28, रा. मुंढवा), ओंकार प्रदीप कांबळे (वय 22, रा. काकरंबा, ता. तुळजापूर, जि. उस्मानाबाद) या दोघांना अटक केली आहे. त्यांच्या विरुद्ध चंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरोडाविरोधी पथक चंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर होते.

त्या वेळी मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पंधरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रांत सासवडकर, विनायक येवले, राजेश अभंगे यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची अगझडती घेतली असता, पिस्तुले व काडतुसे मिळून आली. याप्रकरणी, आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी अ‍ॅड. पल्लवी काशीद यांनी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एच. वानखेडे यांनी ती मान्य करीत त्यास 4 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मुसक्या आवळण्याची मागणी
शहरासह जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असताना, दुसरीकडे पुण्यात एवढ्या मोठ्या संख्येने होणारी पिस्तूल तस्करी चिंतेची बाब ठरू पाहते आहे. त्यामुळे पोलिसांनी वेळीच उपायोजना करून तस्करांचा बंदोबस्त करीत निवडणुकांना सामोरे जाताना कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

Back to top button