पुणे : प्लास्टिक कारवाईतून 11 लाख दंड वसूल | पुढारी

पुणे : प्लास्टिक कारवाईतून 11 लाख दंड वसूल

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘केंद्र शासनाच्या आदेशानंतर पुणे महापालिकेने 1 जुलैपासून शहरातील प्लास्टिक बंदीवरील कारवाई करीत महिनाभरात 205 केसेसमध्ये तब्बल 10 लाख 70 हजार रुपये दंड वसूल केला आहे,’ अशी माहिती घनकचरा विभागाच्या प्रमुख आशा राऊत यांनी दिली. यातून 2 हजार 364 किलो प्लास्टिक पिशव्या आणि बंदी असलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. केंद्र शासनाने संपूर्ण देशभरामध्ये 1 जुलैपासून 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी घातली आहे.

राज्य शासनाने 2018 पासूनच प्लास्टिकवर बंदी लागू केली असून, त्यानुसार महापालिका अंमलजबजावणी देखील करीत आहे. मात्र, केंद्र शासनाच्या आदेशानंतर 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्या आणि वस्तूंवरील कारवाई 1 जुलैपासून अधिक व्यापक स्वरूपात केली जात आहे. महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांतील आरोग्य निरीक्षक आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांच्या संयुक्त पथकांद्वारे ही कारवाई करण्यात येत आहे.

महापालिकेतर्फे सातत्याने प्लास्टिकबंदीबाबत जनजागृती केली जात आहे. नागरिकांनीही पुढाकार घेऊन बंदी असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या-वस्तू मागू नयेत व देणार्‍यांनाही विरोध करावा. अन्यथा पालिकेतर्फे कारवाई केली जाईल.

                                                         विक्रम कुमार, महापालिका आयुक्त

 

Back to top button