पुणे; पुढारी वृत्तसेवा : Pune Crime 'महामेट्रो'च्या पौड रस्त्यावरील हिल व्ह्यु कारशेड येथील कारशेडवर गोळीबार झाल्याचा प्रकार बुधवारी सायंकाळी घडला. यामध्ये मेट्रोच्या एका कर्मचार्याच्या छातीला गोळी चाटून गेल्याने किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान, या परिसरात लष्करी आस्थापनांकडून गोळीबाराचा सराव केला जात असताना हा प्रकार घडला असल्याची शक्यता पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वर्तविली आहे.
अंजयकुमार श्रीवास्तव (वय.24,रा. बिहार) असे जखमी झालेल्या कर्मचार्याचे नाव आहे. याप्रकरणी रात्री उशीरापर्यंत कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेपाच्या सुमारास येथील मेट्रोच्या कारशेडमध्ये कर्मचारी वेल्डिंगचे काम करत होते. त्यावेळी एका कर्मचार्याजवळ काहीतरी वस्तू पडल्याचा भास झाला. त्याने जवळ जाऊन ती वस्तू उचलून पाहिली असता, बंदुकीची पुंगळी असल्याचे आढळून आले. त्यावेळी त्या कर्माचार्याने तेथील सुपरवायझरला या घटनेची माहिती दिली. दरम्यान, त्या ठिकाणी आणखी तीन ते चार वेळा आवाज झाला. सुपरवायझर आल्यानंतर त्यांनी कोथरूड पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता, तेथे बंदुकीच्या गोळीच्या एकुण चार पुंगळ्या सापडल्या. यामध्ये एका कर्मचार्याच्या छातीला गोळी चाटून गेली होती.
मेट्रोचा कारशेड हा कचरा डेपोच्या जागेवर उभारण्यात आला आहे. त्याला लागूनच एक टेकडी असून, त्या टेकडीच्या दुसर्या बाजूला लष्करी आस्थापना आहेत. त्यामुळे या टेकडीवर अनेकदा लष्करी आस्थापनांकडून विविध प्रकारचा सराव केला जातो. दरम्यान, बुधवारी सायंकाळी गोळीबाराचा सराव सुरू असताना, हा प्रकार घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र नेमका गोळीबार कोणी केला हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
मेट्रो कारशेड येथे गोळीबाराची घटना घडली. त्याबाबत मेट्रो कारशेडलगत असलेल्या लष्करी आस्थापनेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येत आहे.
-अमिताभ गुप्ता (पोलिस आयुक्त, पुणे शहर)
बुधवारी सायंकाळी आमचा कर्मचारी कोथरूड येथील हिल व्ह्यु कारशेड येथे वेल्डींगचे काम करत होता. त्यावेळी त्याला हवेतून त्याच्या अंगावर काही तर पडल्यासारखे वाटले. त्याने काय पडले आहे, हे पाहिले असता त्याला बंदूकीची गोळी आढळून आली. मात्र, त्या गोळीने त्या कर्मचार्याच्या छातीला थोडेसे खरचटले. कर्मचारी मुळचा बिहार येथील असून, अंजय कुमार श्रीवास्तव असे त्याचे नाव आहे. पहिली गोळी सापडल्यानंतर परिसरात आणखी त्या कर्मचार्याला दोन गोळ्या पडल्याचे आढळले. त्यामुळे आम्ही तात्काळ पोलिसांत तक्रार दिली.
–हेमंत सोनावणे, महाव्यवस्थापक, महामेट्रो, पुणे