सोमेश्वरनगर : श्रावणी सोमवार यात्रेसाठी सोमेश्वर मंदिरात सजावट | पुढारी

सोमेश्वरनगर : श्रावणी सोमवार यात्रेसाठी सोमेश्वर मंदिरात सजावट

सोमेश्वरनगर; पुढारी वृत्तसेवा: श्रीक्षेत्र करंजे (ता. बारामती) येथील प्रसिद्ध सोमेश्वर मंदिरात सोमवारी (दि. 1) पहिल्या सोमवारी श्रावणातील यात्रा पार पडत आहे. कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांत येथे श्रावण यात्रा रद्द केली होती. दोन वर्षांनंतर यात्रा पुन्हा भरत असल्याने भाविकांत उत्साहाचे वातावरण आहे. देवस्थान ट्रस्टनेही यात्रेची जय्यत तयारी केली आहे. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात साफसफाई केली आहे. तसेच आकर्षक विद्युतरोषणाई, पिण्याच्या पाण्याची सोय, मोफत पार्किंग आणि महाप्रसादाची सोय केली जात आहे. चालू वर्षी मार्च महिन्यात महाशिवरात्री यात्रा उत्साहात पार पडली होती. देवस्थान ट्रस्ट, ग्रामस्थ, ग्रामपंचायत, प्रमुख पदाधिकारी यांनी यात्रेचे नियोजन केल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.

भाविकांनी शिस्तीत दर्शन घेत देवस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष प्रताप भांडवलकर, सचिव राहुल भांडवलकर यांनी केले आहे. दोन वर्षांनंतर यात्रा भरत असल्याने भाविकांसह व्यापारीही सुखावले आहेत. सोमयाचे करंजे म्हणून राज्यात प्रसिद्ध असलेल्या सोमेश्वराच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येथे गर्दी करतात. यात्रेनिमित्त मंदिर परिसरात खेळणी, मिठाई आणि इतर दुकाने लावण्याचे काम सुरू आहे. युवानेते गौतम काकडे यांच्या वतीने मंदिर परिसराला फुलांची आकर्षक सजावट केली आहे.

मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे
वडगाव निंबाळकर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी मंदिर परिसराची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला. भाविकांनी शिस्तीत दर्शन घेत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले आहेत.

 

 

Back to top button