ढगफुटीने तीस एकर क्षेत्रांत गुडघाभर पाणी; धामणी परिसरातील पिके सडण्याच्या मार्गावर | पुढारी

ढगफुटीने तीस एकर क्षेत्रांत गुडघाभर पाणी; धामणी परिसरातील पिके सडण्याच्या मार्गावर

लोणी-धामणी; पुढारी वृत्तसेवा: धामणी (ता. आंबेगाव) परिसरात गुरुवारी (दि. 28) जोरदार पाऊस झाला, तर शुक्रवारी (दि. 29) पहाटे ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने वरच्या बढेकरमळ्यातील सुमारे तीस एकर क्षेत्रातील जमीन उपाळून शेतात गुडघाभर पाणी साचले आहे. त्यामुळे टोमॅटो, भूईमूग, गवार, सोयाबीन तसेच जनावरांची चारापिके सडू लागली आहेत. संबंधित शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सरपंच सागर जाधव यांनी केली आहे.

धामणी परिसर हा कमी पर्जन्याचा भाग म्हणून ओळखला जातो. येथे दरवर्षी अत्यल्प पाऊस होतो. दोन-तीन वर्षांतून कधीतरी या भागात जोरदार पाऊस होतो. पावसाने येथील ओढ्या-नाल्यांना पूर येतो व शेतात पाणी साचून पिकांचे तसेच शेताचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. दोन दिवसांपूर्वी पहाटे झालेल्या जोरदार पावसाने ओढ्या- नाल्यांना पूर आला.

बढेकरमळ्यातील सुमारे 15 ते 20 शेतकर्‍यांची सुमारे तीस एकर जमीन उपाळून शेतात गुडघाभर पाणी साचले आहे. बांध वाहून गेले तसेच पिके पाण्यात जाऊन ती पाण्यावर तरंगत आहेत. पिके सडू लागल्याने संबंधित शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी अशोक बढेकर, संतोष बढेकर, संजय बढेकर, केरभाऊ बढेकर, अशोक जाधव, नवनाथ बढेकर आदी शेतकर्‍यांनी केली आहे.

Back to top button