बाणेर : लोकसहभागातून पाणी प्रश्न सोडवू; आमदार चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन | पुढारी

बाणेर : लोकसहभागातून पाणी प्रश्न सोडवू; आमदार चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

बाणेर; पुढारी वृत्तसेवा; ‘वाढत्या लोकसंख्येमुळे पुण्यातील नागरी सुविधा सक्षम करणे काळाची गरज आहे. बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस आदी भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. महापालिकेला हा प्रश्न सोडविण्यासाठी वेळ लागणार असेल, तर लोकसहभागातून हा प्रश्न सोडवू,’ असे भाजप प्रदेशाध्यक्ष, कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. बाणेर-बालेवाडी-पाषाण-सूस-म्हाळुंगे परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या पाणी प्रश्नाबाबत बाणेर येथील अमोल बालवडकर जनसंपर्क कार्यालयात बैठक झाली, या वेळी ते बोलत होते.

महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, बाबूराव चांदेरे, स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, रोहिणी चिमटे आदी उपस्थित होते. अमोल बालवडकर म्हणाले, ‘खडकवासला धरण साखळीत पुरेसा पाणीसाठा झाला असूनही, केवळ प्रशासनाच्या अनियोजित कारभारामुळे बाणेर-बालेवाडी परिसराला अपुरा पाणीपुरवठा होत आहे. अधिकारी या पाणी प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहेत.’ आयुक्त विक्रम कुमार यांनी बाणेर-बालेवाडी परिसराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा, तसेच वाढीव पंप लावण्यासंदर्भात संबंधित अधिकार्‍यांना सूचना दिल्या.

बोलण्याची संधी न दिल्याची खंत
या बैठकीस भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते. आमदार व आयुक्तांसोबत सर्व पक्षाचे प्रतिनिधी नागरिकांच्या पाणी प्रश्नासाठी एकत्रित येऊन समस्या मांडताना दिसले. परंतु, ज्यांना प्रामुख्याने समस्या आहे, अशा नागरिकांना मात्र बोलण्याची संधी दिली गेली नसल्याची खंत उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.

Back to top button