काय ती गर्दी, काय ते डोंगर, ओक्केच..! सिंहगडावरील निसर्गसौंदर्याचा पर्यटकांनी लुटला आनंद | पुढारी

काय ती गर्दी, काय ते डोंगर, ओक्केच..! सिंहगडावरील निसर्गसौंदर्याचा पर्यटकांनी लुटला आनंद

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: सिंहगडावर रविवारी सुटीच्या दिवशी हजारो पर्यटकांनी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले. पावसाच्या उघडिपीमुळे पर्यटकांनी परिसरातील विलोभनीय निसर्गसौंदर्याचा आनंद लुटला. काय ते डोंगर, काय ते निसर्गसौंदर्य, सगळं ओक्केच..! अशी प्रतिक्रिया पर्यटकांकडून व्यक्त होत होती. दिवसभरात गडावर वाहनाने जाणार्‍या पर्यटकांकडून एक लाख 40 हजार, तर शनिवारी (दि. 30) 90 हजार, असा एकूण सव्वादोन लाख रुपयांचा टोल दोन दिवसांत वन विभागाने वसूल केला. रविवारी सकाळी अकरापर्यंत गडावर फारशी वर्दळ नव्हती. मात्र, त्यानंतर पर्यटकांनी गर्दी केली. त्यामुळे सुरक्षारक्षकांना धावपळ करावी लागली.

गडावरील वाहनतळ तसेच घाटरस्त्यावर वाहतुकीचे नियोजन केल्याने काही अपवाद वगळता घाटरस्त्यावर वाहतूक सुरळीत ठेवण्यात प्रशासनाला यश आले. पावसाच्या उघडिपीमुळे पर्यटकांना चिंब भिजून वर्षाविहाराचा आनंद लुटता आला नाही. त्यामुळे बहुतेक पर्यटक गडावर जादा वेळ न थांबता लवकर माघारी परतत होते. अतिवृष्टीच्या काळात चार दिवस गड बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर सुटीच्या दिवशी मोठ्या संख्येने पर्यटकांनी गर्दी केल्याने घाटरस्त्यापासून डोणजेपर्यंत वाहतूक कोलमडली होती. त्यामुळे रविवारी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे वनपरिमंडल अधिकारी बाबासाहेब लटके व वनरक्षक बाळासाहेब जिवडे यांनी वाहतुकीचे नियोजन केले.

खडकवासला, पानशेत परिसरातही झुंबड
1 जुलैपासून जवळपास महिनाभर सिंहगड, पानशेत परिसरात दमदार पाऊस पडला. त्यामुळे सिंहगड किल्ल्याच्या डोंगररांगा, दरीखोरी हिरवाईने बहरली आहेत. गडावर नरवीर तानाजी मालुसरे समाधी, छत्रपती राजाराम महाराज समाधी परिसरासह कल्याण दरवाजा, प्रवेशद्वार परिसर पर्यटकांनी गजबजून गेला होता. तसेच खडकवासला, पानशेत धरण परिसरात पर्यटकांनी गर्दी केली होती.

Back to top button