पिंपरी : ठरावीक अधिकार्‍यांच्या पुन्हा बदल्या; आयुक्तांनी आपलाच निर्णय फिरविला | पुढारी

पिंपरी : ठरावीक अधिकार्‍यांच्या पुन्हा बदल्या; आयुक्तांनी आपलाच निर्णय फिरविला

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा: सलग तीन वर्षांपेक्षा अधिक काळ एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या महापालिकेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांची दुसर्‍या विभागात आयुक्त राजेश पाटील यांनी बदली केली. बदलीचा आदेश दिल्यानंतर ते त्यात कोणताही बदल करीत नव्हते. त्यासंदर्भात त्यांनी राजकीय दबावालाही भीक घातली नाही. मात्र, आता आयुक्त आपलेच आदेश फिरवत असल्याने पालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली.

आयुक्तांनी 6 जुलैच्या आदेशानुसार उपायुक्त व सहायक आयुक्त यांचे विभाग अचानक बदलून त्यांना नवीन विभागाची जबाबदारी दिली. त्यानुसार उपायुक्त सचिन ढोले यांनी आकाशचिन्ह व परवाना विभाग, उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी क्रीडा विभाग, सहायक आयुक्त सुषमा शिंदे यांनी झोनिपु आणि सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी अभिलेख कक्ष विभागाची जबाबदारी स्वीकारली. उपायुक्त अजय चारठाणकार हे सोमवारी (दि.1) आरोग्य विभागाचा पदभार स्वीकारणार आहेत. तर, त्यांच्या समाज विकास विभागाचा जबाबदारी सहायक आयुक्त रवीकिरण घोडके स्वीकारणार होते.

मात्र, आयुक्तांनी आपलाच आदेश महिन्याच्या आत फिरविला. तीस जुलैच्या आदेशानुसार घोडके यांच्याकडे समाज विकास विभाग न देता तो उपायुक्त इंदलकर यांच्याकडे देण्यात आला आहे. तर, उपायुक्त ढोले यांच्याकडील अतिक्रमण निर्मूलन कामकाज काढून सहाय्यक आयुक्त राजेश आगळे यांच्याकडे देण्यात आला आहे. कार्यकारी अभियंता शिंदे यांना क क्षेत्रीय कार्यालय स्थापत्य विभाग दिले होते. ते बदलून आता ह क्षेत्रीय स्थापत्य विभाग दिला आहे.

कार्यकारी अभियंता मनोज सेठिया यांच्याकडील ह क्षेत्रीय स्थापत्यचे कामकाज काढून घेतले आहे. कार्यकारी अभियंता संजय घुबे यांच्याकडील बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग काढून ते कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे यांच्याकडे देण्यात आले आहे. राणे हे पाणीपुरवठा विभागापूर्वी त्याच विभागात कार्यरत होते. तसेच, स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी निलकंठ पोमण यांच्याकडून स्मार्ट सिटीचे कामकाज काढून घेतले.

Back to top button