पिंपरी : स्मार्ट सिटीतील ‘स्मार्ट रोड’ला कात्री; शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्हिलेज प्लाझा प्रकल्प गुंडाळला | पुढारी

पिंपरी : स्मार्ट सिटीतील ‘स्मार्ट रोड’ला कात्री; शॉपिंग कॉम्प्लेक्स, व्हिलेज प्लाझा प्रकल्प गुंडाळला

मिलिंद कांबळे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वतीने एरिया बेस डेव्हल्पमेंट (एबीडी) अंतर्गत पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव व सांगवी भागात ‘स्मार्ट रोड’चे काम करण्यात येत आहे. मोठा गाजावाजा करून त्यांची घोषणा करण्यात आली. मात्र, काही रस्त्यांसाठी जागाच ताब्यात न मिळाल्याने त्यांना फाटा देण्यात आला आहे. तसेच, शॉपिंग कॉम्प्लेक्स व व्हिलेज प्लाझा या दोन मोठ्या प्रकल्पांसह इतर काही प्रकल्प गुंडाळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. एबीडी भागातील विविध 42 रस्ते पदपथासह ‘स्मार्ट रोड’ने विकसित करण्यात येणार होते. त्या रस्त्यांचे एकूण अंतर 42 किलोमीटर आहे. त्यात पिंपळे गुरवमधील 8.49 किलोमीटर आणि पिंपळे सौदागारमधील 13.33 किलोमीटर अंतराचे रस्ते आहेत. त्यातील 35 रस्त्यांसाठी जागा ताब्यात मिळाले असून, ते स्मार्ट रस्ते विकसित केले जात आहेत.

मात्र, काही जागा ताब्यात आलेले नाहीत. वारंवार पाठपुरावा करूनही जागामालक जागा देत नसल्याने सुमारे 10 ठिकाणच्या स्मार्ट रोडचा नाद कंपनीने सोडून दिला आहे. त्यामुळे तेथे स्मार्ट रोड होणार नाहीत. तर, काही ठिकाणी कमी जागा उपलब्ध झाल्याने ते रस्ते विनापदपथ तयार केले जाणार आहेत. दिल्लीतील पालिका बाजारच्या धर्तीवर पिंपळे सौदागर येथे विविध प्रकारच्या विक्रेत्यांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे शॉपिंग कॉम्प्लेक्स (कर्मशिअल झोन/ व्यापारी संकुल/हॉकर्स झोन) उभारण्यात येणार होते. ते सुमारे 45 कोटी खर्चाचे संकुल पीपीपी तत्वावर उभारण्यात येणार होते. तो प्रकल्प बासनात गुंडाळण्यात आला आहे.

तसेच, पिंपळे गुरव येथे 48 कोटी खर्च करून व्हिलेज प्लाझा उभारण्यात येणार होता. त्यात ग्रामीण संस्कृतीसह तेथील साहित्यांची विक्री करणारे दुकाने, मनोरंजन विभाग असणार होते. मात्र, त्याबाबत कार्यवाही सुरू नसल्याने तो प्रकल्प गुंडाळण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचबरोबर अनेक प्रकल्प व योजनांवर काहीच कार्यवाही केली जात नसल्याने ते फाईलवरच आहेत. परिणामी, ते प्रकल्प प्रत्यक्षात येऊ शकणार नाहीत, असे दिसत आहे.

केंद्राच्या स्मार्ट सिटी अभियानाने मार्च 2022 नंतर स्मार्ट सिटीच्या कोणत्याही निविदा काढण्यास मनाई केली आहे. तसेच, केंद्रांकडून कोणताही निधी दिला जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. स्मार्ट सिटी कंपनी जून 2023 पर्यंत अस्तित्वात राहणार आहे. त्यावरून स्मार्ट सिटी अभियानच गुंडाळल्याचे स्पष्ट होते. या सर्व गोष्टींमुळे स्मार्ट सिटीनेही हात आखडता घेतला आहे. आता सुरू असलेले काम पूर्ण करण्यावर भर दिला आहे.

बायसिकल शेअरिंग योजना ‘क्लोज’
एबीडीतील पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, सांगवी परिसरात पब्लिक बायसिकल शेअरिंग योजना मोठ्या थाटात सुरू करण्यात आली. त्यानंतर पॅन सिटीअंतर्गत शहरभरात शेकडो सायकल उपलब्ध करून देण्यात आल्या. 15 ऑगस्ट 2018 ला सुरू झालेली ही योजना काही महिन्यांतच गुंडाळण्यात आली. शहरात आता एकाही ठिकाणी सायकली नाहीत. मेट्रो स्टेशनवर ठेवण्यात आलेल्या सायकल धूळ खात आहेत.

दंड करूनही काम ‘स्लो’
स्मार्ट सिटीतील कामांना विलंब केल्याने तसेच दर्जा न राखल्याबद्दल अनेक ठेकेदार दोषी आढळले आहेत. अटी व शर्तींचा भंग केल्याने त्यांना लाखोंचा दंड करण्यात आला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीचे अनेक प्रकल्प रखडले आहेत. दंड करूनही त्यांचे काम गतिमान होत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.

Back to top button