अकरावीचे 4 हजार कोटा प्रवेश; दुसर्‍या टप्प्यातील पसंतीक्रमासाठी 2 ऑगस्टपर्यंत मुदत | पुढारी

अकरावीचे 4 हजार कोटा प्रवेश; दुसर्‍या टप्प्यातील पसंतीक्रमासाठी 2 ऑगस्टपर्यंत मुदत

पुणे; पुढारी वृत्तसेवा: अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील नामांकित कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 4 हजार 358 विद्यार्थ्यांनी कोट्यांतर्गत प्रवेश घेतले आहेत. पुणे शहरातील नामांकित महाविद्यालयांमध्ये कोट्यांतर्गत प्रवेशासाठी मोजक्याच जागा शिल्लक राहिल्या आहेत. दरम्यान, दुसर्‍या टप्प्यातील कोट्यांतर्गत शिल्लक जागा रविवारी वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या जागांवर प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना उद्या मंगळवारी 2 ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम नोंदवता येणार आहे.

अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश समितीद्वारे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील 317 कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 1 लाख 11 हजार 510 जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. या प्रवेशप्रक्रियेत 1 लाख 951 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र, 69 हजार 125 विद्यार्थ्यांनी अर्जातील भाग एक आणि दोन पूर्ण भरले आहे. त्यामुळे याच विद्यार्थ्यांचा समावेश प्रवेश यादी तयार करण्यासाठी होणार आहे. या प्रवेशप्रक्रियेत सध्या कोटयांतर्गत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना https://pune.11thadmission.org.in/ या लिंकवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करावे लागणार आहेत. त्यानंतर 3 ऑगस्टला कोटयांतर्गत प्रवेश यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Back to top button