जुन्नर : दरीत अडकलेल्या तरुणाची सुटका; कोकणकडा परिसरात आपत्ती व्यवस्थापन पथकाला यश | पुढारी

जुन्नर : दरीत अडकलेल्या तरुणाची सुटका; कोकणकडा परिसरात आपत्ती व्यवस्थापन पथकाला यश

जुन्नर; पुढारी वृतसेवा: खुटेदरा मार्गाने कोकणकड्यावर (दुर्गावाडी, ता. जुन्नर) जाताना दरीत अडकलेल्या हैदराबादच्या गिर्यारोहकाला आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने वाचविण्यात यश आले. विनोदकुमार गुब्बाल (वय 33, रा. विद्यानगर, हैदराबाद, आंध्र प्रदेश) असे त्याचे नाव आहे. कोकणकड्याकडे शनिवारी (दि. 30) जाताना तो सुमारे 20 फूट घसरून खाली पडला. हातापायाला मार लागल्यानंतरही त्याने अंधारात मार्गक्रमण सुरू ठेवले. मात्र, पुढे गेल्यावर रस्ता न सापडल्याने, तसेच दमछाक झाल्याने तो एका ठिकाणी थांबला.

तेथून त्याने भोर तालुक्यात ट्रेकिंग करणार्‍या मित्रांना येथे अडकल्याचे कळविले. त्यांनी ही माहिती महाराष्ट्र माउंटेनिअरिंग रेस्क्यू सेंटरला कळविली. जुन्नर रेस्क्यू टीमचे प्रशांत कबाडी व मुरबाड येथील दीपक विशे यांना ही माहिती मिळाल्यावर रविवारी (दि. 31) रात्री दीडच्या दरम्यान, ही टीम दुर्गावाडीला रवाना झाली. विनोद हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून, त्याने यापूर्वी कळसूबाई, हरिश्चंद्रगडावरील नळीची वाट, अलंग-मलंग-कुलंग आदी अनेक ट्रेक एकट्याने केले होते. या वेळी त्याने गुगलच्या मदतीने हा ट्रेक निवडला होता. विनोदला मात्र एकट्याने गिर्यारोहण करणे चांगलेच अंगलट आले.

Back to top button