सासवड : पश्चिम महाराष्ट्रात उद्या मुख्यमंत्र्यांची पहिली सभा; माजी मंत्री विजय शिवतारे यांची माहिती | पुढारी

सासवड : पश्चिम महाराष्ट्रात उद्या मुख्यमंत्र्यांची पहिली सभा; माजी मंत्री विजय शिवतारे यांची माहिती

सासवड; पुढारी वृत्तसेवा: राज्यात झालेल्या सत्तापरिवर्तनानंतर मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांची पश्चिम महाराष्ट्रातली पहिली जाहीर सभा मंगळवारी (दि. 2 ऑगस्ट) पुरंदर तालुक्यातील सासवड येथे होणार आहे. पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ, गुंजवणी प्रकल्प, फुरसुंगी-उरुळी पाणी योजना, हवेलीतील गावांचा अवाजवी कर आणि दिवे येथील राष्ट्रीय बाजार, अशा विविध मुद्द्यांची या सभेत तड लागणार असल्याचे बोलले जाते. सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आ. गुलाबराव पाटील, ‘गुवाहाटी’फेम आमदार शहाजीबापू पाटील, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आदी नेते उपस्थित राहणार आहेत, असेही शिवतारे यांनी सांगितले.

राज्यात झालेल्या नाट्यमय घडामोडीनंतर एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यावर त्यांच्या पाठीशी माजी आमदारांपैकी सर्वांत प्रथम पुरंदर-हवेलीचे माजी आमदार विजय शिवतारे उभे राहिले. शिवतारे आणि शिंदे यांचे सख्य असल्याने उठावानंतर मध्यस्थी
करण्याची तयारीही शिवतारे यांनी दर्शविली होती. दरम्यान, मंगळवारी होणारी सभा ही मोठ्या पालखीतळ मैदानावर होणार आहे. या मैदानावर अनेक वर्षांनी सभा होत आहे. मधल्या काळात सासवड पालिकेने हे मैदान सभांसाठी द्यायला बंद केले होते. उद्धव ठाकरे यांचीही सभा याच मैदानावर झाली होती.

Back to top button