पुणे : शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर; खा. संजय राऊत यांच्यावरील कारवाईचा निषेध | पुढारी

पुणे : शिवसेना कार्यकर्ते रस्त्यावर; खा. संजय राऊत यांच्यावरील कारवाईचा निषेध

पुणे; पुढारी वृत्तेसवा: पत्राचाळ घोटाळाप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) चौकशीनंतर ताब्यात घेतले. या कारवाईच्या निषेधार्थ पुणे शहर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. कारवाईच्या निषेधार्थ पुण्यातील सारसबाग चौकात शहरप्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकार तयार करण्यामध्ये खासदार राऊत यांचा पुढाकार होता. गेली अडीच वर्षे ते माध्यमांसमोर येऊन भाजपच्या चुकांवर टीका करत होते, याचाच राग भाजपला होता. दीड महिन्यापासून त्यांना नोटीस बजावली जात आहे.

ज्या दिवशी त्यांना ईडीच्या कार्यालयात बोलावले, त्या दिवशी त्यांना अटक का केली नाही? असा सवाल उपस्थित करत राज्यपालांनी मुंबईविषयी जे वक्तव्य केले, त्यानंतर राज्यात आंदोलने सुरू झाली, या विषयावरून लक्ष विचलित करण्यासाठी खासदार राऊत यांना ताब्यात घेण्यात आले, असा आरोप संजय मोरे यांनी केला. ‘जो भाजपात प्रवेश करतो, तो धुतल्या तांदळासारखा होतो. जो भाजपच्या विरोधात बोलतो त्याच्याविरोधात ईडीची कारवाई होते. संपूर्ण देशातील नागरिकांनी केवळ भाजपचाच झेंडा हातात घ्यायचा का? म्हणजे गुन्हा होणार नाही, असे मोदी सरकारला सांगायचे आहे ? त्यांनी समोर येऊन सांगावे, संपूर्ण देश त्यांच्या मागे उभा राहील.

म्हणजे आपल्या देशात गुन्हे घडणार नाहीत, पोलिसांचीही गरज नाही. ही कारवाईची कुठली पद्धत आहे. सरकारच्याविरोधात कोणी बोलायचे नाही का? सगळ्यांनी तोंड बंद ठेवून घरी बसायचं का? जे महाविकास आघाडी सरकारमधील त्या आमदारांना भीती दाखवली, ईडीची धमकी दिली ते सगळे आता धुतल्या तांदळासारखे झाले का?’ असा सवालही मोरे यांनी उपस्थित केला. आंदोलनात पुणे शहरप्रमुख गजानन थरकुडे, उपशहरप्रमुख बाळा ओसवाल, डॉ. अमोल देवळेकर, आनंद गोयल, भरत कुंभारकर, विधानसभा प्रमुख अशोक हरणावळ, विशाल धनवडे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

राज्यपालांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र आणि मराठी माणसांबद्दल वादग्रस्त विधान करून संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान देणार्‍या हुतात्म्यांचा अवमान केला आहे. याच्या निषेधार्थ शहर शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले. वादग्रस्त विधान करून राज्यात जातीय तेढ निर्माण केल्याने राज्यपालांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. शिवसेनेने आंदोलन करून राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला. या वेळी शिवसेनेचे पुणे शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे, शहर उपप्रमुख प्रशांत राणे, बाळासाहेब मालुसरे, भरत कुंभारकर, उमेश वाघ आदी उपस्थित होते. या वेळी राज्यपाल ‘गो बॅक’, जातीवाद-प्रांतवाद निर्माण करणार्‍या राज्यपालांचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या.

Back to top button