पुणे : ई-गाड्या 6700; चार्जिंग स्टेशन फक्त 67 | पुढारी

पुणे : ई-गाड्या 6700; चार्जिंग स्टेशन फक्त 67

प्रसाद जगताप

पुणे : शहरात दिवसेंदिवस ई-वाहन खरेदीचे प्रमाण वाढत आहे. दहा वर्षांत जवळपास 6 हजार 700 ई-गाड्या पुणेकरांनी खरेदी केल्या आहेत. मात्र, त्या तुलनेत केवळ 67 चार्जिंग स्टेशन आहेत. पर्यावरणातील प्रदूषणात घट करण्यासाठी शासनाचे इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण आहे. त्यासाठी शहरात 500 चार्जिंग स्टेशन उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे,परंतु या कामाचा वेग संथ असल्याचे दिसून येत आहे. पुणेकरांमध्ये पर्यावरण संवर्धन व प्रदूषण कमी करण्याबाबत आता चांगलीच जनजागृती झालेली आहे.

त्यामुळे पुणेकर नागरिक डिझेल, पेट्रोलवरील गाड्यांना बाय… बाय… करून इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करत आहेत. मात्र, शासनाने देखील नागरिकांना पेट्रोल, डिझेल पंपांप्रमाणे सार्वजनिक ई-चार्जिंग स्टेशन उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, परंतु पुणे शहरात वाढणार्‍या वाहनांच्या तुलनेत ई-चार्जिंग स्टेशन कमी आहेत. अचानक रस्त्यात गाडी बंद पडली तर चार्जिंग कुठे करावी, ही समस्या येते. त्यामुळे अजूनही पुणेकर नागरिक ई-गाड्या खरेदी करतात, पण त्या लांब पल्ल्यासाठी वापरत नाहीत. त्याकरिता ते दुसरे पेट्रोल, डिझेलवरील चालणारे वाहनच वापरण्यास प्राधान्य देतात.

ई-गाड्यांचे प्रकार संख्या
(जाने. ते 23 जुलै 2022 )
बस 147
ई-रिक्षा पॅसेंजर 08
ई-रिक्षा गुड्स 66
गुड्स कॅरिअर 01
मोटार कॅब 34
मोटारसायकल 6 हजार 05
मोटार कार 463
एकूण 6 हजार 724
(स्रोत – प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे)

नवीन वीजजोडणी दिलेली चार्जिंग स्टेशन्स
पिंपरी चिंचवड
19
पुणे शहर
37
ग्रामीण मंडळ
11
पुणे परिमंडळ
67
इलेक्ट्रिक वाहने पर्यारवणपूरक असतात. या वाहनांमुळे कोणतंही प्रदूषण होत नाही. पेट्रोल भरण्यासाठी जागोजागी पेट्रोलपंप असतात, तशी इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणे अत्यावश्यक आहे. फ्यूल स्टेशन्सच्या तुलनेत फारच कमी चार्जिंग स्टेशन आहेत. ही समस्या युद्धपातळीवर दूर करावी. त्यामुळे प्रदूषण रोखण्यात हातभार लागू शकेल, असे पर्यावरण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

पेट्रोल, डिझेलवर धावणारी गाडी असेल तर सर्वत्र बिनधास्त फिरता येते. मात्र, इलेक्ट्रिक गाडी पुण्याच्या बाहेर काढताना मनात भीती असते. रस्त्यातच बंद पडली तर चार्जिंग कुठे करायची? हा मोठा प्रश्न असतो. त्यामुळे केवळ पुणे शहरातच वाहन वापरतो. शासनाने लवकरात लवकर चार्जिंग स्टेशन उभारावीत.

                                                 – नितीन इंगुळकर, वाहनचालक

शासनाने प्रथमत: संपूर्ण सार्वजनिक वाहतूक सेवा ई-चार्जिंगवर चालणारी करावी. त्यानंतर शहरातील चारचाकी, दुचाकीसारखी सर्व वाहने इलेक्ट्रिक करावीत. सर्व वाहने इलेक्ट्रिकमध्ये परिवर्तीत झाल्यास प्रदूषण कमी होणार आहे. सध्या ई-चार्जिंगची व्यवस्था नसल्यामुळे पीएमपीच्या ई-गाड्या धूळखात पडल्या आहेत. त्यामुळे शहरात सार्वजनिक ई- वाहतूक आणि इतर ई-गाड्यांना प्रोत्साहन देण्याकरिता चार्जिंग स्टेशन वाढवायला हवीत.

सुजित पटवर्धन, वाहतूक अभ्यासक, विश्वस्त, परिसर संस्था

Back to top button