परदेशी विद्यार्थ्यांनी मानवतेचा संदेश द्यावा; पीएमआरडीएचे आयुक्त दिवसेंचा सल्ला

पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांचा सन्मान करताना सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्यासह प्र-कुलपती 
डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते आदी मान्यवर.
पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांचा सन्मान करताना सिंबायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्यासह प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते आदी मान्यवर.

पुणे; पुढारी वृत्तसेवा: 'आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करून, मानवतेचा संदेश द्यावा. संकटामुळे डिप्रेशनमध्ये न जाता मित्रांशी संवाद साधत, मार्ग काढावा,' असा सल्ला पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी 'सिंबायोसिस'मधील परदेशी विद्यार्थ्यांना दिला. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक केंद्राकडून रविवारी आयोजित कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला. या वेळी डॉ. दिवसे बोलत होते. या वेळी विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. रजनी गुप्ते, सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कौन्सिलच्या अध्यक्षा प्रार्थना उदय आदी उपस्थित होते.

या वेळी 85 देशांमधून जमलेल्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख परिधान करीत, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवस साजरा केला. विद्यार्थ्यांनी डॉ. मुजुमदार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. डॉ. दिवसे म्हणाले, 'सिंगापूरमध्ये मी 'पब्लिक पॉलिसी'चे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी गेलो असता, त्या वेळी माझ्यासोबत 25 देशांचे विद्यार्थी होते. त्यामुळे मला आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे प्रश्न माहीत आहेत. अशा वेळी आपल्याला एकमेकांच्या देशातील प्रश्न समजून घेत, एकत्रित तोडगा काढता येतो. आपल्या परदेशी मित्रांना भेडसावणार्‍या समस्या सोडविण्याचा अनुभव मिळतो. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणाच्या वेळी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांकडून मिळालेला अनुभव आपल्याला करिअर घडवण्यासाठी उपयोगी पडतो.'

सध्या श्रीलंका, अफगाणिस्तानसह अन्य देशांमध्ये ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यांचा तेथील नागरिकांना त्रास होत आहे. हे केवळ तिथल्या नियोजनकर्त्या लोकांमुळे झाले आहे. याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. शांती निर्माण करणे, हाच चांगला पर्याय आहे. विद्यार्थी काहीतरी ध्येय्य ठेवून परदेशात शिक्षणासाठी जात असतात. त्या वेळी कोणत्याही पालकांना काळजी असते, बाहेरच्या देशात आपल्या मुलांची काळजी कोण घेणार, परंतु पुण्यात सिंबायोसिसने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची काळजी घेत, एकप्रकारे मानवता आणि शांततेचा संदेश दिला असल्याचेही दिवसे यांनी यावेळी सांगितले. डॉ. येरवडेकर यांनी स्वागतपर भाषणात आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिवसाच्या आठवणी सांगितल्या. डॉ. गुप्ते यांनी आभार मानले.

'मानवतेचा संदेश देण्याचा प्रयत्न'
डॉ. मुजुमदार म्हणाले, की 1971 मध्ये 'सिंबायोसिस'ची स्थापना केली. 'वसुधैव कुटुंबकम्' म्हणजे संपूर्ण जगच एक कुटुंब आहे. या विचाराने संस्था सुरू करून आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली. जगातील जवळपास 85 देशांमधील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणासाठी येतात. त्यांना भारतीय संस्कृतीतील मूल्ये आणि शिक्षण दिले जाते. यातूनच जगाला 'वसुधैव कुटुंबकम्'सारखा मानवतेचा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न असतो.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news