पुणे : पतीला मारहाण करणार्‍या पत्नीसह कुटुंबीयांना शिक्षा | पुढारी

पुणे : पतीला मारहाण करणार्‍या पत्नीसह कुटुंबीयांना शिक्षा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: पती व पत्नीमधील विकोपाला गेलेले वाद सोडविण्यासाठी आलेल्या सासूने जावयावर चाकूने हल्ला केला तर सासरच्यांनी मारहाण केल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले. अखेर, न्यायालयाने आरोपींना एक वर्ष परिविक्षाधीन अधिकारी यांच्या देखरेखीखाली राहण्याचा आदेश दिला. याखेरीज, या काळात शांतता व चांगली वर्तणूक ठेवण्यासह फिर्यादीला 12 हजार रुपये नुकसानभरपाईचा आदेश दिला. वर्षा व विशाल (नावे बदलली आहेत.) अशी पत्नी आणि पतीची नावे आहेत. वर्षा घरकाम करते तर विशाल हा चालक म्हणून काम करतो. त्यांच्यात किरकोळ कारणावरून सातत्याने वाद होत होते.

पती-पत्नीमधील वाद मिटविण्यासाठी पत्नीच्या आईसह तिचा मामा 4 नोव्हेंबर 2013 रोजी वाकड परिसरात आले होते. सायंकाळी साडेसातच्या सुमारास सर्व जण विशाल याच्या घरी जमले होते. या वेळी सासू व मामेसासरे हे विशाल यांना समाजावून सांगत होते. या वेळी शाब्दिक वाद झाल्याने विशाल याच्या सासरकडच्यांनी त्यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या वेळी विशाल याची पत्नी वर्षा हिने घरातील स्वयंपाक घरातून सुरी आणली. वर्षाच्या आईने विशालवर सुरीने वार करत दुखापत केली.

या वेळी वर्षासह अन्य नातेवाईकांनी विशालला मारहाण केली. याप्रकरणी विशाल याने हिंजवडी पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सहाय्यक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी आठ साक्षीदार तपासले. त्यांचा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने आरोपींना एक वर्ष परिविक्षाधीन अधिकारी यांच्या देखरेखीखाली राहण्याचा आदेश दिला आहे. याखेरीज, या काळात शांतता व चांगली वर्तणूक ठेवण्याचा आदेश देऊन आरोपींनी फिर्यादीला 12 हजार रुपये नुकसानभरपाई स्वरुपात द्यावे, असेही निकालात नमूद केले. न्यायालयीन कामकाजासाठी पोलिस शिपाई नितीन पराळे यांनी
सहकार्य केले.

Back to top button