सराईत घरफोड्याला अटक; नंदुरबार येथून पोलिसांनी ठोकल्या बेड्या | पुढारी

सराईत घरफोड्याला अटक; नंदुरबार येथून पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा: लॉकर दुरुस्तीच्या बहाण्याने विविध ठिकाणी घरफोडी करणार्‍या एका सराईत गुन्हेगाराला बंडगार्डन पोलिसांनी नंदुरबार जिल्ह्यातून बेड्या ठोकल्या. त्याच्या अल्पवयीन साथीदारालादेखील ताब्यात घेण्यात आले आहे. प्रधानसिंग ऊर्फ पठाण बख्तारसिंग शिकलीकर (41, रा. नंदुरबार) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. शिकलीकर हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर गुजरात राज्यातील राजकोट, सुरत शहरात 7 घरफोडींचे गुन्हे दाखल आहेत. लॉक दुरुस्तीसाठी नट आणण्याचे सांगून घरातील महिलेला बाहेर पाठविल्यानंतर बनावट चावीने कपाट उघडून 15 तोळे दागिने आणि दोन लाख रुपये रोकड घेऊन तो पसार झाला होता.

माहिती मिळताच बंडगार्डन पोलिसांनी अवघ्या 24 तासांत दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मंगळवारी (दि. 26) ताडीवाला रस्ता परिसरात ही घटना घडली होती. लॉक दुरुस्त करण्याकरिता दोघे जण मंगळवारी ताडीवाला रस्ता भागात फिरत होते. फिर्यादी यांच्या कपाटाचे लॉक खराब झाल्याने त्यांनी दोघांना लॉक दुरुस्त करण्याचे सांगितले. त्यानुसार, चोरट्यांनी दुरुस्तीच्या बहाण्याने घरात प्रवेश केला. लॉक दुरुस्तीसाठी नट लागणार असल्याचे सांगून दोघांनी नट आणण्यासाठी महिलेला घराबाहेर दुकानामध्ये पाठविले. तर, घरातील मुलाला तेल घेऊन येण्यास सांगितले.

ही संधी साधून एका बनावट चावीने कपाटाचे लॉक खोलून तब्बल 15 तोळ्यांचे दागिने आणि 1 लाख 90 हजारांची रोकड घेऊन दोघेही पसार झाले. महिलेने सांगितलेले आरोपीचे वर्णन आणि सीसीटीव्हीतील फुटेजच्या आधारे तपास करून आरोपी हे नंदुरबार येथे असल्याची माहिती पोलिस कर्मचारी नितीन जगताप यांना गुजरात येथील बातमीदारांकडून समजली. त्यानंतर बंडगार्डन पोलिसांचे एक पथक नंदुरबार येथे गेले होते. तेथे आरोपी हे मुद्देमाल विकण्याच्या तयारीत असतानाच त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून 15 तोळे सोन्याचे दागिने व 1 लाख 90 हजारांची रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, आश्विनी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल पवार, कर्मचारी संजय वणवे, अमोल सरडे, यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

असे करायचे चोरी…
शिकलीकर हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, तो घरफोड्या करण्यात पटाईत आहे. तो शहरात आल्यानंतर एखाद्या लॉजवर आपला तळ ठोकतो. त्यानंतर विविध ठिकाणी लॉक दुरुस्ती करण्याच्या बहाण्याने फिरतो. एखाद्या व्यक्तीने घरात लॉक दुरुस्तीसाठी बोलावले, की लॉकचे साहित्य घेऊन येण्यासाठी घरातील व्यक्तीला तो बाहेर पाठवतो. त्याच वेळी एखादी व्यक्ती दुसरी जर घरात असेल, तर तिलादेखील वेगळा बहाणा सांगून तेथून दूर जायला लावतो. दरम्यान, संधी मिळताच घरातली किमती ऐवज चोरी करून तो पोबारा करतो. अशा प्रकारे त्याने अनेक ठिकाणी चोर्‍या केल्या आहेत. अगदी बाहेरच्या राज्यातदेखील त्याच्यावर असे गुन्हे दाखल आहेत.

 

Back to top button