रुग्णालय चालवायला पैसेच नाहीत; सरदार पटेल रुग्णालयाची वाटचाल खासगीकरणाकडे | पुढारी

रुग्णालय चालवायला पैसेच नाहीत; सरदार पटेल रुग्णालयाची वाटचाल खासगीकरणाकडे

समीर सय्यद

पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात नागरिकांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मात्र, त्या चालविण्यासाठी बोर्डाकडे निधीच नसल्याने या सुविधा आता ‘तथास्तू क्रिटिकल केअर’ या खासगी संस्थेला चालविण्यास दिल्या आहेत. त्यामुळे गरीब रुग्णांची खासगी रुग्णालयांप्रमाणे आर्थिक लूट तर होणार नाही ना, अशी भीती व्यक्त केली जात आहे. गोळीबार मैदान येथे असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात अत्यल्प दरात आरोग्य सेवा कॅन्टोन्मेंट बोर्ड उपलब्ध करून देत होते. आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी बोर्ड प्रशासनाने पंतप्रधान निधीतून 20 खाटांचे आयसीयू सुरू केले आहे. तसेच इतर भौतिक सुविधा सामाजिक दायित्व निधीतून उपलब्ध करून दिल्या आहेत.

त्यामुळे या रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार सेवा मिळत आहेत, असा दावा रुग्णालय प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी आता रुग्णांना पूर्वीपेक्षा अधिक म्हणजेच शासनाच्या उपचाराच्या दरानुसार पैसे मोजावे लागत आहेत. पटेल रुग्णालयात दररोज 200 ते 250 ओपीडीचे रुग्ण येतात. तर वीस खाटा आयसीयूत आहेत. सामान्य विभागात प्रत्येकी 23 खाटा पुरुष आणि महिलांसाठी आहेत. येथे प्रसूतिगृहाचीही सुविधा आहे. या ठिकाणी उपचार घेण्यासाठी सोयीचे ठरत आहे. मात्र, यातील आयसीयू आणि पॅथालॉजी विभाग खासगी संस्थांना चालविण्यासाठी देण्यात आले असून, या ठिकाणी उपचार घेण्यासाठी पैसे मोजावे लागत आहे. दरम्यान, नियमापेक्षा अधिक पैसे घेत असल्याचा आरोप सामाजिक संस्थांनी केला आहे, तर हे आरोप आरोग्य प्रशासनाने फेटाळून लावले आहेत.

रुग्णांची हेळसांड थांबली; पण…
पटेल रुग्णालयात पूर्वी काही मर्यादित चाचण्या केल्या जात होत्या, तर उर्वरित चाचण्या या बाहेरून करून घेण्याचा सल्ला दिला जात होता. परंतु, आता रुग्णालयातील लॅब खासगी संस्थेकडे चालविण्यासाठी देण्यात आली आहे. सर्वच चाचण्या आता रुग्णालयात केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णांची होणारी हेळसांड थांबली आहे, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. मात्र, खासगीकरणामुळे अनावश्यक चाचण्या करायला लावून रुग्णांची आर्थिक लूट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दर सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत
कँटोन्मेंटमध्ये गरीब कुटुंबांची संख्या अधिक असून, त्यांच्यासाठी पटेल रुग्णालय हे वरदान ठरलेले आहे. परंतु, आता रुग्णालयातील आयसीयू विभाग खासगी संस्थेला चालविण्यासाठी दिले आहे. ही संस्था 24 तासांचे तीन हजार रुपये आकारत आहे. हे दर गरीब रुग्णांना परवडणारे नाही, त्यामुळे हे दर किमान 15 टक्क्यांनी कमी करावे.

                                             – विकास भांबुरे, अध्यक्ष, कर्तव्य फाउंडेशन.

कॅन्टोन्मेंट बोर्डाची आर्थिक स्थिती नाजूक असून, मालमत्ता करातून बोर्डाचे कामकाज चालत आहे, तर उत्पन्नाचे दुसरे स्रोत नसल्याने आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सरदार पटेल रुग्णालयातील आयसीयू चालविण्यासाठी दर महिन्याला 30 लाख रुपये खर्च येतो; परंतु बोर्डाकडे निधी नसल्याने हे खासगी संस्थेला चालविण्यासाठी देण्यात आले आहे. सध्याची आर्थिक स्थिती पाहता बोर्डाला ‘आयसीयू’ चालवणे शक्य नाही.

                – सुब्रत पाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड.

Back to top button