पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : शहरात गेल्या महिनाभरात डेंग्यूचे 37 बाधित रुग्ण आढळले आहेत. गेल्या महिन्याच्या तुलनेत हे रुग्णसंख्या जवळपास दुपटीपेक्षा अधिक झाली आहे. तसेच, जुलै महिन्यात डेंग्यूचे 503 संशयित रुग्ण आढळले आहेत. जून महिन्यात डेंग्यूचे 299 संशयित तर, 17 बाधित रुग्ण आढळले होते. तर, जुलै महिन्यात या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. महिनाभरात 503 संशयित तर, 37 बाधित रुग्ण आढळले आहेत. डेंग्यू झालेल्या रुग्णांची रक्त साखळण्याची प्रक्रिया होऊ नये म्हणून विशेष काळजी घ्यावी लागते. विषाणूजन्य आजारांमध्ये प्रामुख्याने 7 दिवसांमध्ये रोगप्रतिकारशक्ती तयार होते.
त्यामुळे डेंग्यू रुग्णांना योग्य वैद्यकीय उपचार मिळाल्यानंतर ते रुग्ण देखील बरे होतात. चिकुनगुनिया आणि हिवतापची साथ नियंत्रणात शहरात चिकुनगुनिया आणि हिवतापची (मलेरिया) साथ सध्या नियंत्रणात आहे. चिकुनगुनियाचे जून महिन्यात 7 रुग्ण आढळले होते. तर, जुलै महिन्यात फक्त 5 रुग्ण आढळले आहे. हिवतापचे गेल्या महिन्यात 2 बाधित रुग्ण आढळले होते. तर, जुलै महिन्यात मात्र एकही रुग्ण आढळलेला नाही. महापालिका वैद्यकीय विभागाकडून ही आकडेवारी मिळाली आहे. संबंधित आकडेवारीनुसार सध्या तरी या आजारांची साथ नियंत्रणात असल्याचे चित्र आहे.
डेंग्यू रोखण्यासाठी प्रतिबंध गरजेचा
डेंग्यू आजार पसरण्यास एडिस इजिप्ती हे डास कारणीभूत ठरतात. डेंग्यू झालेल्या रुग्णास एडिस इजिप्ती हा डास चावल्यास रोग्याच्या रक्तातील विषाणू त्या डासाच्या शरीरात शिरतात. असा विषाणुजन्य डास निरोगी व्यक्तीस चावल्यास त्याला डेंग्यु होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे डेंग्यूची साथ आटोक्यात ठेवण्यासाठी एडिस इजिप्ताय डासांच्या उत्पत्तीला आळा घालणे गरजेचे ठरते. त्यासाठी काही दक्षता घेणे गरजेचे आहे. घरात पाणी साठविण्याची सर्व भांडी पाणी वापरुन रिकामी करुन कोरडी केल्यानंतरच त्यात पुन्हा पाणी भरावे.
घरातील पाण्याच्या मोठ्या टाक्या रिकाम्या करता येत नसतील तर त्यावर घट्ट झाकण बसवावे. घरातील फ्लॉवरपॉट, कुलर व फ्रीजखालील ट्रे मधील पाणी दर आठवड्यास रिकामे करावे. घराच्या अंगणात किंवा गच्चीवर असलेल्या भंगार मालाची विल्हेवाट लावावी. घराभोवती पाण्याची डबकी असतील तर ती बुजविणे किंवा सदर ठिकाणी पाणी वाहते राहील, याची दक्षता घ्यायला हवी, असे महापालिका वैद्यकीय विभागाने स्पष्ट केले आहे.