राजगुरूनगर : गावठी पिस्तूल बाळगणारा अटकेत | पुढारी

राजगुरूनगर : गावठी पिस्तूल बाळगणारा अटकेत

राजगुरूनगर; पुढारी वृत्तसेवा: गावठी पिस्तूल बाळगणार्‍या आरोपीला खेड पोलिसांनी सापळा रचून अटक केली. गणेश सुखराज गोसावी (वय 22, रा. एसटी स्टँड पाठीमागे, आनंदनगर, राक्षेवाडी, ता. खेड) असे त्याचे नाव आहे. पोलिस निरीक्षक सतीशकुमार गुरव यांनी ही माहिती दिली. पार्टी करून धिंगाणा घालणार्‍यांवर वचक राहावा, यासाठी खेड पोलिसांनी शुक्रवारी (दि. 28) रात्री उशिरापर्यंत गस्त सुरू ठेवली होती. या वेळी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेअकराच्या सुमारास राक्षेवाडी परिसरात कमरेला पिस्तूल लावून फिरणार्‍या गणेश गोसावी याला पोलिसांनी पकडले.

झडतीत त्याच्याकडे गावठी बनावटीचे 35 हजार रुपये किंमतीचे पिस्तूल व जिवंत काडतूस आढळून आले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक सतीशकुमार गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल लाड, उपनिरीक्षक भारत भोसले, पोलिस अंमलदार संतोष घोलप, स्वप्निल गाढवे, निखिल गिरीगोसावी, सचिन जतकर, शेखर भोईर आदींनी ही कारवाई केली.

Back to top button