पुणे : समाज कल्याण आयुक्त फिल्डवर; शासकीय वसतिगृहात मुक्काम | पुढारी

पुणे : समाज कल्याण आयुक्त फिल्डवर; शासकीय वसतिगृहात मुक्काम

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्याच्या समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणार्‍या शासकीय वसतिगृह योजनेबाबत विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी संवाद कार्यक्रम हा अभिनव उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून आयुक्तांनी थेट गोल्फ क्लब येथील शासकीय वसतिगृहात रात्रभर मुक्काम ठोकून विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
या उपक्रमाचे विद्यार्थ्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले असून, राज्यात प्रथमच अशा प्रकारे एखाद्या विभागाचा प्रमुख वसतिगृहात रात्रभर मुक्काम करण्याची घटना घडली आहे. या संवाद उपक्रमामुळे शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनादेखील सुखद धक्का बसला आहे.

डॉ. नारनवरे यांनी स्वतः विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधत त्यांना मिळणार्‍या सुविधा, जेवण व विद्यार्थ्यांमार्फत राबविण्यात येणारे उपक्रम याबाबत माहिती घेतली. नुसते आयुक्तच नाही तर समाज कल्याण विभागाचे राज्यातील सर्वच उपायुक्त, सहायक आयुक्त, समाज कल्याण अधिकारी यांनी त्या त्या जिल्ह्यात शासकीय वसतिगृहात मुक्काम केला आहे. यापुढेही प्रत्येक महिन्यात विद्यार्थ्यांबरोबर मुक्काम करण्याची सक्ती करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांच्या सूचना व मागणीनुसार त्यांना योग्य त्या सुविधा पुरविण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी कौशल्य विकास कार्यक्रम तसेच विविध तज्ज्ञ व्यक्तींचे व्याख्यान आयोजित करण्याबाबतदेखील निर्देश दिले. या संवाद कार्यक्रमाप्रसंगी आयुक्त यांच्यासमवेत सह आयुक्त भारत केंद्रे, प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी, सहायक आयुक्त विजयकुमार गायकवाड हे उपस्थित होते.

तक्रारी आल्यास सक्त कारवाई
संवाद उपक्रमांतर्गत डॉ. नारनवरे यांनी येथील वसतिगृहात जेवणदेखील विद्यार्थ्यांबरोबरच केले. विद्यार्थ्यांनीदेखील अनेक गोष्टींवर मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी वसतिगृह गृहप्रमुख व गृहपाल यांना वसतिगृहात निवास करणेबाबत सक्त ताकीद दिली व तक्रारी प्राप्त झाल्यास सक्त कारवाई करण्याचे निर्देश दिले.

Back to top button