भीमाशंकर : माळीण दुर्घटनेच्या जखमा अजूनही तशाच! | पुढारी

भीमाशंकर : माळीण दुर्घटनेच्या जखमा अजूनही तशाच!

भीमाशंकर; पुढारी वृत्तसेवा: 30 जुलै 2014 ची पहाट माळीण या गावासाठी कधीही न विसरता येणारी आहे. काही सेकंदांत संपूर्ण गावच ढिगार्‍याखाली गाडले गेले आणि काही क्षणांत 151 लोक मृत्युमुखी पडले. निसर्गाच्या कोपाने डोंगराचा कडा कोसळून गाडल्या गेलेल्या दुर्दैवी माळीणच्या घटनेला 30 जुलै रोजी 8 वर्षे पूर्ण होतील. आंमडे गावच्या हद्दीत नवीन माळीण गाव वसवण्यात आले अन् जुन्या माळीण गावाच्या ठिकाणी दगावलेल्या 151 लोकांसाठी स्मृतिस्तंभ बांधण्यात आले, परंतु या ठिकाणी येणा-या पर्यटकांनी हा सेल्फी पॉइंट केला असल्याने पर्यकांनी आमच्या भावनेशी खेळू नये.

आमच्या आठवणी, भावना या ठिकाणी दडल्या आहेत, अशी खंत येथील ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. 30 जुलै 2014 रोजी डोंगराने अख्खे माळीण गाव गिळंकृत केले. या दुर्घटनेत 44 कुटुंबातील 151 लोक दगावले. 9 जण वाचले तर 39 लोक बाहेरगावी असल्याने बचावले. प्रशासनाने युध्दपातळीवर मदतकार्य राबविले आणि या दुर्घटनेत बचावलेल्या लोकांसाठी तात्पुरते पत्र्याचे निवारा शेडमध्ये पुनर्वसन करण्यात आले. त्यानंतर आंमडे गावच्या हद्दीत नवीन माळीण गाव बसवण्यात आले. येथे 68 घरे बांधण्यात आली.

पाणी प्रश्न गंभीर
नवीन माळीणचा अजूनही कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सुटला नाही. उन्हाळ्यात अजूनही माळीणकरांना डोक्यावर हंडा घेऊन पाणी आसाणे येथून आणावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

आमचे घर हे जुन्या माळीण शाळेसमोर होते. त्यामुळे मी आज आहे. पण, मला ते आठवल्यावर भ्या वाटते.
     – रोहित गणेश झांजरे, इयत्ता आठवी

 

Back to top button