पुणे : तब्बल 67 लाखांचा ‘हनी ट्रॅप’; एका सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक | पुढारी

पुणे : तब्बल 67 लाखांचा ‘हनी ट्रॅप’; एका सराईत गुन्हेगारासह दोघांना अटक

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकवून तरुणी आणि साथीदारांनी एका तरुणाकडून 67 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचे समोर आले आहे. सतत होणारा पैशांचा तगादा आणि धमक्यांमुळे घाबरलेल्या तरुणाने गुन्हे शाखेकडे तक्रार दिल्यानंतर एका सराईतासह दोघांना अटक करण्यात आली. चेतन रवींद्र हिंगमिरे (रा. काळेपडळ, हडपसर), निखील ऊर्फ गौरव ज्ञानेश्वर म्हेत्रे (रा. गाडीतळ, हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका तरुणीसह तिघांविरुद्ध कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका 26 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. फिर्यादी तरुणाच्या चुलतभावाचा खडी मशीन व्यवसाय (स्टोन क्रशर) आहे. तो चुलतभावाच्या कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करतो.

तरुणाकडे खडी मशिनचे आर्थिक व्यवहार आहेत. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात तो नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा परिसरात गेला होता. त्या वेळी तेथील एका लॉजवर मुक्कामासाठी थांबला होता. त्या वेळी एकाने त्याला तरुणीचा मोबाइल क्रमांक देऊन संपर्क साधण्यास सांगितले. तक्रारदार तरुण आणि तरुणीची ओळख झाली. दोघेजण बोपदेव घाट परिसरात भेटले. तरुणीशी ओळख वाढल्यानंतर त्याने तिला आर्थिक मदत केली. त्यानंतर तरुणीने त्याच्याकडे दुचाकी खरेदीसाठी पैसे मागितले. तरुणाने तिला ऑनलाइन 25 हजार रुपये पाठविले. त्यानंतर तरुणीने पुन्हा त्याच्याशी संपर्क साधला. ‘मी गर्भवती असून, होणारा पती चेतन हिंगमिरेला हा प्रकार समजला आहे,’ असे तरुणीने त्याला सांगितले.

घाबरलेल्या तरुणाने आरोपी तरुणी आणि हिंगमिरेला पैसे दिले. त्यानंतर हे प्रकरण वानवडी पोलिसांकडे गेले असून, तरुणी अल्पवयीन असल्याचे आरोपी निखील म्हेत्रेने सांगितले. तक्रारदार तरुणाला वाघोली येथे बोलावून आरोपींनी जिवे मारण्याची धमकी दिली. त्याच्याकडून वेळोवेळी 67 लाख 7 हजार 553 रुपये उकळले. घाबरलेल्या तरुणाने अखेर गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज दिला. गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील आणि पथकाने आरोपी हिंगमिरे आणि म्हेत्रे यांना अटक केली.

या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, त्यातील चेतन सराईत गुन्हेगार आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
                                             – हेमंत पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा

कधी इस्टेट एजंट; कधी बांधकाम व्यावसायिक
शहरात यापूर्वीदेखील असे प्रकार समोर आले आहेत. विमानतळ परिसरातील एका रिअल इस्टेट एजंटला हनीट्रॅपमध्ये खेचून तरुणी व तिच्या दोघा साथीदारांनी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 44 लाख रुपयांची खंडणी उकळली होती. पनवेल येथील एका बांधकाम व्यावसायिकाची इन्स्टाग्रामवर पुण्यातील तरुणीसोबत ओळख झाली. संबंधित तरुणीने व्यावसायिकाला आपल्या जाळ्यात खेचले. त्यानंतर त्याला भेटण्याच्या बहाण्याने पुण्यात बोलावले.

मात्र, पुण्यात येऊन तरुणीला भेटणे या व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले होते. तसेच पनवेल येथील बांधकाम व्यावसायिकाला जाळ्यात खेचून लुटलेल्या हनीट्रॅप टोळीतील तरुणीने इतर साथीदारांच्या मदतीने गोपाळपट्टी मांजरी येथील एका विद्यार्थ्याकडून तब्बल 20 लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. व्यावसायिकाने तक्रार देण्याचे धाडस दाखविल्यानंतर कोंढवा पोलिसांनी या टोळीला जेरबंद केले.

 

Back to top button