क्षयरोग निर्मूलनासाठी पहिली वॉररूम पुण्यात | पुढारी

क्षयरोग निर्मूलनासाठी पहिली वॉररूम पुण्यात

पुणे : क्षयरोग निर्मूलनाच्या कार्यक्रमाला वेग मिळावा यासाठी क्षयरोग अंमलबजावणी कक्षाची अर्थात वॉररूमची स्थापना करण्यात आली आहे. केंद्रीय क्षयरोग निर्मूलन विभागाकडे सुसज्ज अंमलबजावणी कक्ष उपलब्ध आहे. राज्यस्तरीय क्षयरोग अंमलबजावणी कक्ष तयार करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे. क्षयरोगाशी संबंधित आकडेवारी, नियमित विश्लेषण, पाठपुरावा करण्यासाठी अंमलबजावणी कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. निर्मूलन कार्यक्रमाशी संबंधित माहिती, सूचना, निदानात्मक सुविधा, उपचारात्मक सुविधा, डी.बी.टी. योजना याविषयी दररोज तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळणार आहे. निक्षय अहवाल व व्यवस्थापन अहवाल मिळवणेही यामुळे अधिक सोपे होणार आहे.

क्षयरोग अंमलबजावणी कक्षाचे उद्घाटन राज्याचे आरोग्य सेवा आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांच्या हस्ते झाले. नियोजन, अंमलबजावणी, संनियंत्रण, पाठपुराव्याद्वारे क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाचे गाव पातळीपर्यंत विकेंद्रीकरण करून या कार्यक्रमात लोकसहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन आंबाडेकर, सहसंचालक डॉ. रामजी अडकेकर, डॉ. संदीप भारस्वाडकर, डॉ. समीर कुमटा आदी उपस्थित होते.

क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत निगडित सर्व डेटा तयार करण्यात येऊन कार्यक्रमात येणार्‍या अडी-अडचणी, नियोजन व सहयोगी विचारमंथन करून त्यातून कार्यक्रमाच्या चांगल्या नियोजनासाठी याची मोठी मदत होणार आहे. यात खासगी, शासकीय व स्वयंसेवी संस्थांच्या कार्यांचा आढावा घेऊन त्यानुसार कार्यप्रणाली अद्ययावत करण्यावर भर दिला जाणार आहे. या कार्यप्रणालीद्वारे जिल्हा व तालुक्यांशी थेट संवाद होऊन दैनंदिन कामकाजात गतिमानता येणार असून गुणवत्ता व सुधार करण्यासाठीच्या कृती करण्याकडे कल निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Back to top button