पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट जास्त; कोरोना रुग्णसंख्या घटल्याने मात्र दिलासा | पुढारी

पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट जास्त; कोरोना रुग्णसंख्या घटल्याने मात्र दिलासा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सध्या राज्यामध्ये पुणे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट जास्त आहे. मात्र, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने नागरिकांना आणि प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत यंदाच्या आठवड्यात रुग्णसंख्या 11 टक्क्यांनी घटली आहे. राज्यातील रुग्णसंख्या 5 टक्क्यांनी कमी झाली आहे. पुणे जिल्ह्यात 13 ते 19 जुलै या कालावधीत 5274 इतक्या कोरोनाबाधितांचे निदान झाले होते. 20 ते 26 जुलै या कालावधीत रुग्णसंख्या 4646 इतकी नोंदवली गेली आहे.

राज्यात या कालावधीत 14 हजार 400 कोरोनाबाधित आढळून आले होते. त्यापैकी पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे आणि नाशिक या पाच जिल्ह्यांमध्ये मिळून 9608 रुग्ण तर इतर जिल्ह्यांमध्ये मिळून 4792 इतके रुग्ण नोंदवले गेले आहेत. पुणे जिल्ह्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट 18.06 टक्के इतका आहे. त्यानंतर नागपूरचा 14.51 टक्के आहे. राज्याचा सरासरी पॉझिटिव्हिटी रेट 5.80 टक्के आहे. राज्याच्या सरासरीपेक्षा 16 जिल्ह्यांचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट जास्त, तर 19 जिल्ह्यांचा कमी आहे. कोरोना रुग्णसंख्या घटत असली तरी स्वाईन फ्लू, डेंग्यू अशा साथीच्या आजारांचा धोका वाढत असल्याचा इशारा सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आला आहे.

Back to top button