पुणे : झुंज नगरसेवकांतच; काही सर्वसाधारण जागांवरही ओबीसींचा दावा | पुढारी

पुणे : झुंज नगरसेवकांतच; काही सर्वसाधारण जागांवरही ओबीसींचा दावा

ज्ञानेश्वर बिजले

पुणे : महापालिका निवडणुकीसाठी जागांचे आरक्षण शुक्रवारी निश्चित झाल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात अनेक ठिकाणी नगरसेवक समोरासमोर उभे ठाकणार असल्याचे स्पष्ट झाले. आरक्षणातील बदलाचा फायदाही काही प्रभागात झाल्याने अनेकांनी सुटकेचा
निःश्वासही सोडला.

गणेश बीडकर, प्रशांत जगताप, श्रीनाथ भिमाले, अरविंद शिंदे, साईनाथ बाबर, पृथ्वीराज सुतार यांच्याबरोबरच आमदार, खासदार यांची मुले-मुली निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत. ओबीसीचे आरक्षण झाल्याने या प्रवर्गातील अनेकांना संधी मिळाली. मात्र, त्याचवेळी या प्रवर्गातील काहीजणांना सर्वसाधारण गटात लढावे लागणार असल्यामुळे त्यांच्यासमोर उमेदवारी मिळविण्यापासूनची चिंता वाढली आहे. प्रभागात दोन महिलांसाठी आरक्षण असल्याने, राहिलेल्या एका जागेवर उमेदवारी मिळविण्यासाठी नगरसेवक व प्रमुख कार्यकर्त्यांना ताकद पणाला लावावी लागणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींना आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, अनुसूचित जाती व जमातींचे आरक्षण जुनेच कायम ठेवून शुक्रवारी पुन्हा आरक्षण सोडत काढण्यात आली. ओबीसी आरक्षण निश्चित करताना सर्वसाधारण गटातील महिलांसाठी पूर्वी जाहीर झालेली आरक्षणे रद्द करण्यात आली. पुण्यातील 173 सदस्यांचा जागांपैकी अनुसूचित जातीसाठी 23, अनुसूचित जमातीसाठी दोन जागा आहेत. ओबीसीसाठी 46 जागांचे आरक्षण ठरविताना त्यापैकी निम्म्या म्हणजे 23 जागा महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या.

ओबीसींच्या जागा ठरल्यानंतर सर्वसाधारण (महिला) गटाचे नवीन आरक्षण ठरविण्यात आले. या गटातील 44 जागा राखीव झाल्यानंतर, उर्वरीत सात प्रभागांत सर्वसाधारण गटातील महिलांसाठी आरक्षणे निश्चित करताना, सर्वसाधारण खुल्या गटांना तेथे निवडणूक लढविता येणार नसल्याचे स्पष्ट झाले. गेल्या वेळी काही प्रभागात महिलांसाठी दोन जागा राखीव झाल्या होत्या, तेथे आता एकच जागा महिलांसाठी राहिली आहे. दुसर्‍या बाजूला जेथे एक जागा महिलांसाठी होती, तेथे दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्याने, तेथे इच्छुकांना समोरासमोर लढावे लागणार आहे. त्यातच ओबीसी आरक्षणामुळे अनेक मतदारसंघातील गणिते बदलली आहेत.

कोथरूडमधील गणिते बदलली
कोथरूडमध्ये शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या प्रभाग 31 (कोथरूड गावठाण शिवतीर्थनगर) मध्ये दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्याने, उर्वरीत एका जागेवर शिवसेनेचे पृथ्वीराज सुतार, योगेश मोकाटे, मनसेचे किशोर शिंदे यांना लढावे लागणार आहे. शिवसेनेसमोर उमेदवार ठरविताना मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रभाग 36 (कर्वेनगर) मध्ये भाजपला राजेश बराटे व सुशील मेंगडे यांच्यातून एकाला निवडावे लागेल. कोथरूड मतदारसंघातील प्रभाग 13 (बाणेर, सूस, म्हाळुंगे) व 14 (पाषाण, बावधन बुद्रुक) मध्ये सर्वसाधारण खुल्या दोन जागा आहेत. त्यापैकी एखाद्या प्रभागात भाजपचे अमोल बालवडकर व राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबूराव चांदेरे यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे. प्रभाग 12 (औंध बालेवाडी) मध्ये भाजपच्या स्वप्नाली सायकर व अर्चना मुसळे या नगरसेविकांमध्ये ओबीसी महिला जागेवरील उमेदवारी मिळविण्यासाठी रच्चीखेच होईल. प्रभाग 30 (जयभवानीनगर, केळेवाडी) मध्ये काँग्रेसच्या वैशाली मराठे व भाजपच्या छाया मारणे या नगरसेविका समोरासमोर येण्याची शक्यता आहे.

कसबा पेठेत उलथापालथ

कसबा पेठ मतदारसंघात प्रभाग 17 (शनिवारपेठ नवीपेठ) व 18 (शनिवारवाडा कसबापेठ) मध्ये चार जागा महिलांसाठी, तर दोन जागा सर्वसाधारण खुल्या गटासाठी आहेत. या दोन जागेवर प्रमुख पक्षांतील ओबीसी इच्छुक अधिक प्रभावी आहेत. रवींद्र धंगेकर, हेमंत रासने यांच्यासोबतच धीरज घाटे, बापू मानकर, कुणाल टिळक यांची नावे चर्चेत आहेत. प्रभाग 28 (महात्मा फुले स्मारक, भवानी पेठ) मध्ये सर्वसाधारण गटासाठी एकच जागा असल्याने राष्ट्रवादीचे वनराज आंदेकर व शिवसेनेचे विशाल धनावडे समोरासमोर येण्याची शक्यता आहे. प्रभाग 29 (घोरपडे पेठ उद्यान महात्मा फुले मंडई) मध्ये ओबीसी व सर्वसाधारण अशा दोन जागांवर नगरसेवकांना संधी मिळणार आहे. गेल्या आरक्षणाच्या सोडतीमध्ये येथे एकच जागा होती. दोन जागा झाल्याने नगरसेवकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

वडगाव शेरीत फार बदल होणार नाहीत

वडगाव शेरी मतदारसंघात प्रभाग 3 (लोहगाव, विमाननगर) मध्ये इच्छुकांची संख्या मोठी असून, खुल्या गटासाठी जागाच नाही. येथे ओबीसी जागेवर कडवी लढत होईल. प्रभाग 4 (पूर्व खराडी, वाघोली) सर्वसाधारण गटाच्या एका जागेवर उमेदवार निवडताना सर्वच पक्षांपुढे अडचण येणार आहे. प्रभाग 5 (पश्चिम खराडी, वडगावशेरी) मध्ये ओबीसी व सर्वसाधारण अशा दोन जागा असल्याने पठारे यांच्यातील संघर्ष टळला. राष्ट्रवादीकडून महेंद पठारे व भाजपकडून सुरेंद्र पठारे निवडणुकीच्या रिंगणात येतील. प्रभाग 8 (कळस फुलेनगर) मध्ये ओबीसी (महिला) आरक्षण आहे. तेथे सर्वसाधारण जागेवर शीतल सावंत किंवा त्यांचे पती अजय सावंत यांना लढावे लागेल.

खडकवासलामध्ये चुरस

खडकवासला मतदारसंघात प्रभाग 56 (चैतन्यनगर भारती विद्यापीठ) मध्ये ओबीसी व सर्वसाधारण अशा दोन जागा असल्याने, राष्ट्रवादीचे विशाल तांबे व युवराज बेलदरे यांच्यातील तिढा सुटला आहे. सिंहगड रस्त्यावरील प्रभाग 52 (नांदेड सिटी सनसिटी) येथे सर्वसाधारण एकच जागा असून तेथे भाजपचे नगरसेवक प्रसन्न जगताप व श्रीकांत जगताप इच्छुक आहेत. प्रभाग 35 (रामनगर उत्तमनगर, शिवणे) मध्ये सर्वसाधारण (महिला) या एका जागेसाठी राष्ट्रवादीच्या नगरसेविका सायली वांजळे व जिल्हा परीषद सदस्या अनिता इंगळे यांच्यात चुरस आहे.

हडपसर निर्णायक

हडपसरमध्ये 42 नगरसेवक असल्यामुळे तेथील भाजप व राष्ट्रवादी यांच्यातील लढत निर्णायक ठरणार आहे. प्रभाग 43 (वानवडी कौसरबाग) मध्ये राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप निवडणुकीच्या रिंगणात उतरतील. येथील सर्वसाधारण (महिला) जागेसाठी राष्ट्रवादीच्या नंदा लोणकर व भाजपच्या कालिंदा पुंडे या नगरसेविकांमध्ये लढत होईल. प्रभाग 46 (मोहम्मदवाडी, उरुळी देवाची) मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक नाना भानगिरे व भाजपचे नगरसेवक संजय घुले यांच्यात सामना रंगण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक 41 (कोंढवा खुर्द, मिठानगर) मध्ये मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर व राष्ट्रवादीचे नगरसेवक गफूर पठाण समोरासमोर येतील. प्रभाग 47 (कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी) मध्ये शिवसेनेच्या संगीता ठोसर, भाजपच्या रंजना टिळेकर आणि वैशाली कामठे या तीन नगरसेविका एका जागेवरच दावा सांगणार आहेत. त्यांच्यात लढत अटळ आहे. प्रभाग 24 (मगरपट्टा साधना विद्यालय) मध्ये राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांचा मुलगा ईशान इच्छुक आहे.

पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये अटीतटीचा संघर्ष

प्रभाग 19 (छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, रास्तापेठ) मध्ये भाजपचे माजी सभागृहनेते गणेश बीडकर यांना सर्वसाधारण गटातून लढावे लागेल. प्रभाग 20 (पुणे स्टेशन मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता) मध्ये महिलांसाठी दोन जागा आरक्षित झाल्याने, सर्वसाधारण जागेवर काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे व राष्ट्रवादीचे प्रदीप गायकवाड हे नगरसेवक समोरासमोर येतील. प्रभाग 21 (कोरेगाव पार्क, मुंढवा) येथे ओबीसीसाठी एक जागा असून, अन्य दोन जागा महिलांसाठी आहेत. तेथे भाजपच्या लता धायरकर व मंगला मंत्री या दोन नगरसेविकांसोबतच राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका इच्छुक आहेत. ओबीसी जागेवर भाजपचे नगरसेवक उमेश गायकवाड व मनसेचे नेते बाबू वागसकर यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.

पर्वतीत पक्षांपुढे निवडीचे आव्हान

पर्वती मतदारसंघात बहुतेक ठिकाणी नगरसेवकांना हवे तसे आरक्षण पडल्याचे दिसून येते. प्रभाग 38 (शिवदर्शन पद्मावती) मध्ये सर्वसाधारण व सर्वसाधारण (महिला) अशी आरक्षणे आहेत. तेथे काँग्रेसचे आबा बागूल, राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम हे ओबीसी असले तरी या सर्वसाधारण जागेवरून लढण्याची शक्यता आहे. बागूलच्या विरोधात भाजपकडून महेश वाबळे किंवा धीरज घाटे या नगरसेवकांची नावे चर्चेत आहेत. प्रभाग 39 (मार्केटयार्ड, महर्षीनगर) मध्ये ओबीसीसाठी जागा वगळता अन्य दोन जागा महिलांसाठी आहेत. तेथून प्रवीण चोरबेले निवडून आले होते.

प्रभाग 40 (बिबवेवाडी गंगाधाम) मध्येही दोन जागा महिलांसाठी असून, सर्वसाधारण जागेवर ओबीसी प्रवर्गातील भाजपचे माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले इच्छुक आहेत. तेथेच आमदार माधुरी मिसाळ यांचा मुलगा करण हाही इच्छुक आहे. आमदार सुनील कांबळे यांची कन्याही या भागातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. पर्वतीतील एकूण 21 नगरसेवकांपैकी 11 जागी महिला असून, त्यामध्ये अनुसूचित जातीच्या तीन व ओबीसीच्या दोन महिलांचा समावेश आहे. अनुसूचित जातीसाठी दोन व ओबीसीसाठी तीन जागा आहेत. त्यामुळे सर्वसाधारण गटासाठी केवळ पाच जागा असून, त्यापैकी दोन जागांवर ओबीसीचे प्रबळ नगरसेवक दावा सांगत आहेत. त्यामुळे, राजकीय पक्षांपुढे निवडीचे आव्हान उभारणार आहे.

शिवाजीनगर मतदारसंघात अनेक उमेदवार तुल्यबळ

प्रभाग 16 (फर्ग्युसन कॉलेज, एरंडवणा) भाजपसाठी सेफ असला, तरी तेथे इच्छुक नगरसेवकांची संख्या मोठी आहे. ओबीसी (महिला), सर्वसाधारण (महिला) व सर्वसाधारण अशा जागा असून, दीपक पोटे, नीलिमा खाडे, ज्योत्स्ना एकबोटे, माधुरी सहस्त्रबुद्धे, मंजुश्री खर्डेकर, जयंत भावे हे सहा नगरसेवक इच्छुक आहेत. त्यांच्यापैकी काहीजण प्रभाग 33 (आयडीयल कॉलनी महात्मा सोसायटी) या भाजपसाठीच्या सेफ प्रभागातून लढवू इच्छितात. माजी महापौर मुरलीधर मोहोळ तेथून प्रमुख इच्छुक आहेत.

याव्यतिरिक्त भाजपचे प्रमुख कार्यकर्तेही या प्रभागांत उमेदवारी मागत असल्याने, तेथे उमेदवार ठरविण्याचे भाजपसमोर आव्हान राहील. प्रभाग 15 (गोखलेनगर, वडारवाडी) मध्ये माजी नगरसेवक नीलेश निकम, दत्ता बहिरट, आदित्य माळवे, मुकारी आलगुडे, नीता मंजाळकर यांच्यासह अनेकजण इच्छुक आहेत. प्रभाग 12 (औंध, बालेवाडी) मध्येही एका सर्वसाधारण जागेवर अनेकांची नजर आहे. प्रभाग 10 (शिवाजीनगर गावठाण, संगमवाडी) मध्येही दोन जागा महिलांसाठी आरक्षित झाल्याने, उर्वरीत सर्वसाधारण जागेवर उमेदवार निवडीचे आव्हान सर्व पक्षांपुढे राहील.

Back to top button