शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत अडचणी विद्यापीठाकडे मांडा: प्र-कुलगुरू डॉ. सोनवणे | पुढारी

शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत अडचणी विद्यापीठाकडे मांडा: प्र-कुलगुरू डॉ. सोनवणे

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ‘शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने समिती नेमली आहे, त्यामुळे महाविद्यालयांनी आपल्या शंका, सूचना विद्यापीठाकडे मांडाव्यात, ’ असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी केले. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन वर्षापूर्वी 29 जुलै 2020 रोजी देशभर लागू झाले. या दिवसाच्या दुसर्‍या वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठात विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी डॉ.सोनवणे बोलत होते.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘नवीन शैक्षणिक धोरण 2020’ अंमलबजावणी समितीचे अध्यक्ष व विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, समिती सदस्य राजीव साबडे व डॉ. संजय चाकणे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.संतोष परचुरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी डॉ.सोनवणे यांनी नवीन शैक्षणिक धोरणातील प्रचलन पद्धत, शोधन पद्धत, कृतन पद्धत आदी बाबींबाबत सविस्तर माहिती दिली. 4 वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमात कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव असणार असल्याबाबतही सांगितले.

अनुभवात्मक शिक्षणाचे महत्त्व आणि त्याची गरज त्यांनी उदाहरण देत विस्तृत केली. पांडे म्हणाले, ‘महाविद्यालयांनी हे शैक्षणिक धोरण सकारात्मकतेने घेणे अत्यंत गरजेचे आहे, अन्यथा पुढील काळात सर्वच असंबद्ध होईल. या धोरणाने सर्व आकाश विद्यार्थ्यांसाठी खुले करून दिले आहे, हवे ते शिकण्याची मुभा दिली आहे आणि शिक्षणात मोठे परिवर्तन घडवले आहे. आपण सर्वजण या परिवर्तनाचे साक्षीदार होऊया’. तर डॉ. चाकणे यांनी नवीन शैक्षणिक धोरणातील सर्वसमावेशक शिक्षण, अ‍ॅकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स याबाबत सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वामीराज भिसे यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यापीठातील विभागप्रमुख तसेच महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Back to top button